काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली होती. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली, तर भाजपने महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या राजकारणात सक्रिय असलेल्या सत्यजित उर्फ नाना कदम यांना उमेदवारी दिली होती.
या निकालानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये पाटील यांनी थेट आव्हान दिलं होतं. 'आज चॅलेंज आहे आपलं. ज्याला वाटतं असेल त्यानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या विधानसभेच्या कोणत्याही मतदारसंघाचा राजीनामा द्यायचा. पोटनिवडणूक लावायची.. निवडून नाही आलो ना तर सरळ राजकारण सोडून हिमालयात निघून जाईन, असं पाटील म्हणाले होते. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओ वरून मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आमदार अमोल मिटकरी यांनी टोला लगावला आहे.
या निवडणुकीत जिंकण्यासाठी भाजपने ताकद पणाला लावली असून भाजपच्या बड्या नेत्याची फौज भाजपने लावली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मूळचे कोल्हापूरचे असून इथेच बसून होते. तरीही भाजपला विजय मिळवता आला नाही. या पराभवानंतर जितेंद्र आव्हाड यांनी चंद्र्कांत पाटीलांचा एक फोटो ट्विट करत त्यांची खिल्ली उडवली आहे. या मध्ये चंद्रकांत पाटील हे हिमालयात बसल्याचे दिसून येत आहे.हे फोटो ट्विट करत आव्हाड यांनी दादा परत या असे कॅप्शन दिले आहे.
तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ही ट्विट करत चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. ते ट्विट मध्ये म्हणतात, ''हनुमान जयंतीच्या पवित्र दिनी कोल्हापूरमधील पराभवानंतर चंद्रकांत दादांना राजकारण सोडून हिमालयात जावे लागणार हे पाहून फार दुःख झाले. दादा तुम्ही अशी वल्गना करायला नको होती, तुमच्यामुळे राजकारणात रोज मनोरंजन होत असे'',