अंनिसच्या आक्षेपानंतर 'ती' भोजनाची पंगत बंद

मंगळवार, 25 एप्रिल 2023 (21:16 IST)
नाशिक : प्रतिनिधी 
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लढ्याला नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये यश आलं आहे. या ठिकाणी वेगळी पंगत बसवण्याची प्रथा अंनिसच्या आक्षेपानंतर बंद झाली आहे. मागील शेकडो वर्षांपासून ग्रामदेवता महादेवीच्या नावाने गाव जेवणाची परंपरा सुरू होती. 
 
त्र्यंबकेश्वरमध्ये महादेवी ट्रस्टकडून या गावजेवणाचे आयोजन केले जाते. त्यामध्ये साधारण १० हजार लोक जेवण करतात. मात्र, गावातील एका विशिष्ट समाजाच्या भोजनासाठी लागणारे अन्न वेगळे शिजवले जाते. या विशिष्ट समाजाची भोजनाची पंगत इतर समाजबांधवापासून वेगळी बसते, असा महाराष्ट्र अंनिसच्या नाशिक व त्र्यंबकेश्वरमधील कार्यकर्त्यांनी आरोप केला होता. विशेष म्हणजे लोकवर्गणीतून जमा झालेल्या रकमेतूनच हे गावजेवण होते. हे गावजेवण रविवारी (२३ एप्रिल) होणार होते. मात्र , अंनिसने विशिष्ट समाजासाठी वेगळा स्वयंपाक करणे आणि त्यांच्या वेगळ्या पंगती बसवण्याला विरोध केला. त्याबाबत प्रशासनालाही निवेदन देत हस्तक्षेपाची व कारवाईची मागणी केली.
 
अंनिसने अशा आशयाचे निवेदन त्र्यंबकेश्वरचे तहसिलदार व पोलीस निरीक्षकांना दिले. त्यांच्याशी या पंगतभेदाबाबत सविस्तर चर्चा केली. गावजेवणात एका विशिष्ट समाजासाठी वेगळ्या ठिकाणी अन्न शिजवणे आणि त्यांची वेगळी पंगत बसविणे ही राज्य घटनेशी विसंगत अनिष्ट व अमानवीय प्रथा आहे. तसेच सामाजिक विषमतेला बळ देणारी गोष्ट आहे, असं सांगितलं. यानंतर तहसिलदारांनी संबंधित ट्रस्टींना बोलावून समज दिली. पोलीस प्रमुखांनीही कायद्याचे पालन करून एकोप्याने राहण्याच्या आणि सर्वांनी एकाच पंगतीत भोजनाचा आनंद घेण्याच्या अंनिसच्या मागणीला पाठबळ दिलं.
 
अंनिसच्या आवाहनाला ट्रस्टींकडूनही सकारात्मक प्रतिसाद दिला.  ट्रस्टींनीही योग्य तो निर्णय घेऊन सर्वांना एकाच पंगतीत भोजन घेण्यासाठी आवाहन केले. त्यामुळे वर्षानुवर्षे चालत आलेली विशिष्ट समाजाची वेगळी पंगत बसण्याची प्रथा संपुष्टात आली. 
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती