त्र्यंबकच्या संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी प्रशासन सज्ज

सोमवार, 5 फेब्रुवारी 2024 (09:14 IST)
त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगर परिषदेसह, प्रशासन आणि निवृत्तीनाथ मंदिर संस्थानने जोरदार तयारी केली आहे. यंदा यात्राकाळात पाच लाख भाविक येण्याचा अंदाज असून सुमारे ६०० दिंड्या त्र्यंबकमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
 
तर दुसरीकडे मात्र, नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील खड्ड्यांसह यात्रोत्सवात येणारे रहाट पाळणे, तमाशा फड यांना पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने यात्रेकरूंनी नाराजी व्यक्त केली आहे.
 
यंदाच्या यात्रेनिमित्त त्र्यंबक नगर परिषदेकडून यात्रेसाठी येणा-या भाविकांना दिवाबत्ती, स्वच्छता, टॉयलेट सुविधांसह आरोग्याच्या सेवा पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच निर्मल वारीसाठी मोठा निधी मंजूर झाला असून जागोजागी प्लास्टिक फायबर शौचालये उभारण्यात आली आहेत. याशिवाय भाविकांसाठी विविध ठिकाणी पाण्याच्या टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 
पोलिसांचा चोख बंदोबस्त
त्र्यंबकमध्ये यंदाच्या यात्रेसाठी होणा-या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये २ डीवायएसपी, ६ पीआय, २१ पुरुष पीएसआय व एपीआय, ४ महिला अधिकारी, २१० पोलिस अंमलदार पुरुष आणि ६० महिला व पुरुष अंमलदार यांचा समावेश आहे. त्यामुळे यंदाच्या यात्रेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा असणार आहे.
 
स्वच्छतागृहांची व्यवस्था
भाविकांची संख्या लक्षात घेता त्र्यंबक नगर परिषदेने विविध ठिकाणी तात्पुरती १४०० फिरती शौचालये उभारली असून २६ ठिकाणी २५० प्रसाधनगृहे उभारली आहेत. याकामी ८ सक्षम व्हॅन, पाण्याचे २२ टँकर, पाण्याचे २०० ड्रम यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर स्वच्छतेसाठी ४१ पुरुष व १८ महिला कर्मचा-यांची नियुक्ती केली आहे. त्याबरोबरच नगर परिषदेची १३ ठिकाणची सार्वजनिक स्वच्छतागृहे देखील भाविकांसाठी खुली असणार आहेत. याशिवाय विद्युत व्यवस्था, माहिती फलक, सुपरव्हिजन करण्याकामी ८ कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली आहे.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती