नाशिक : सिंहस्थाच्या निमित्ताने "इतक्या" कोटींचे रस्ते प्रस्तावित

मंगळवार, 5 डिसेंबर 2023 (19:56 IST)
नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७-२८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. सिंहस्थानिमित्त होत असलेल्या कामांसाठी राज्य वा केंद्र सरकारने निधी दिल्यानंतर कामांचे नियोजन करून ती कामे पूर्ण करण्यासाठी कमी वेळ मिळतो. यामुळे महापालिकेने आगामी सिंहस्थाच्या दृष्टीने कामांचे आधीच नियोाजन करण्याची भूमिका घेऊन तसे प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यासाठी प्रारुप आराखडा तयार केला आहे.
 
दरम्यान आगामी  सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी प्रस्तावित केलेल्या कामांचा मिळून ८ हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात एकट्या बांधकाम विभागाच्या तीन हजार कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे.
 
मागील सिंहस्थामध्ये महापालिकेने हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार करून कामे केली होती. त्या तुलनेत यावेळी महापालिकेने जवळपास आठपट आराखडा तयार केला आहे. अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ आराखडा समन्वय समितीने ४२ विभागांकडून माहिती घेत बनवलेल्या आराखड्यात सर्वाधिक ३ हजार ७३८ कोटी रुपयांची कामे बांधकाम, पाणी पुरवठा व यांत्रिकी विभागाची आहेत. त्याखालोखाल सार्वजनिक आरोग्यअंतर्गत मलनिस्सारण विभागाचा २४७१ कोटींचा प्रारुप आराखडा सादर करण्यात आला आहे.
 
३०० किलोमीटरचे रस्ते
बांधकाम विभागाकडून सिंहस्थाच्या आराखड्यात शहरात रस्त्याचे जाळे अधिक सक्षम करण्यास प्राधान्य दिले आहे. सिंहस्थ कालावधीत मुख्य शहरातील वाहतूक टाळत इनर रिंगरोडचा वापर करण्यासाठी शहरात तीनशे किलोमीटर रस्त्यांचे जाळे उभारण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जुन्या रिंगरोडची रुंदी वाढवणे, अस्तरीकरण व शक्य तेथे कॉक्रिटिकरणचा समावेश असेल. या ३०० किलोमीटरच्या रस्त्यांमध्ये १९० किलोमीटरचे इनर रिंगरोडला जोडणाऱ्या रस्त्यांचा समावेश आहे. मागील सिंहस्थात पंधरा मीटरचे रिंगरोड उभारण्यात आले होते. त्यातील बहुतांश रस्त्याची दुरवस्था झाली आहे. काहीची मागील बारा वर्षांपासून डागडुजीही झाली नाही. या १५ मीटर रस्त्यांचे रुंदीकरण करून ते तीस मीटरचे केले जाणार आहे. तसेच या आराखड्यात काही रस्त्यांच्या भूसपंदानाच्या रकमेचाही समावेश आहे.
 
सिंहस्थ आराखड्यातील विभागनिहाय रक्कम ( कोटी रुपयांत)
 
    बांधकाम विभाग, पाणीपुरवठा व यांत्रिकी : ३७३८.५०
    सार्वजनिक आरोग्य, मलनिस्सारण : २४९१.२१
    सिटी लिंक (बससेवा)  १४२८.३७
    आरोग्य विभाग : ५३२.५८
    वेस्ट मॅनेजमेंट : १५१.३६
    विद्युत विभाग : ११६.६०
    आपत्कालिन व्यवस्था : ६३.२३
    उद्यान : २३.५०
    माहिती व जनसंपर्क : ८.७८
    एकूण :  ८११७.७६

Edited by -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती