सकल मराठा समाजाच्या वतीने नाशिक व त्र्यंबकेश्वरमधील जुन्या पुरोहितांची भेट घेऊन त्यात मराठा समाजबांधवांची कुणबी अशी नोंद आहे की काय, याचा शोध घेतला. तीर्थक्षेत्रातील पुरोहितांकडे धार्मिक कामासाठी आलेल्या यजमानांची संपूर्ण माहिती असते, अशी माहिती ठेवण्याची परंपरा आहे. त्यामुळे अनेक पिढ्यांचीदेखील माहिती असते. मराठा समाजासाठी असलेल्या कुणबी नोंद शोधण्यासाठी पुरोहितांची भेट घेऊन वंशावळीबाबत चर्चा करण्यात आली.
शासन निर्णयानुसार मराठा समाजातील कुणबी नोंदी शोधणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. यासाठी शासन स्तरावर प्रत्येक तालुक्यात, तसेच शहरातील तहसील कार्यालयात आपल्या जुन्या नोंदी पाहण्याची सोय करण्यात आली आहे. यासोबतच सकल मराठा समाज नाशिकच्या बैठकीत ठरल्यानुसार चंद्रकांत बनकर, राजेंद्र शेळके, योगेश नाटकर पाटील, अविनाश वाळुंजे यांनी पुरोहित संघाचे अध्यक्ष माजी नगरसेवक सतीश शुक्ल यांची सदिच्छा भेट घेतली. नाशिक तसेच त्र्यंबकेश्वर येथील पुरोहितांकडे असलेल्या वंशावळीसंबंधी सतीश शुक्ल यांनी सविस्तर माहिती दिली, तसेच नोंदी कशा प्रकारे केलेल्या आहेत याचीही संपूर्ण माहिती दिली.
कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता मराठा समाजातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी ब्राह्मण महासंघ, पुरोहित संघ तसेच सर्व ब्राह्मण संघटना सदैव मदतीस तत्पर असतील, असे सतीश शुक्ल यांनी सांगितले.