नाशकात चंगाई सभेच्या नावाखाली धर्मांतराचा प्रकार? अंनिससह, संघटनांची पोलिसात धाव

गुरूवार, 25 ऑगस्ट 2022 (21:26 IST)
शहरातील पेठेनगर भागात चंगाई सभेच्या नावाखाली भलताच उद्योग होत असल्याचा आरोप विविध संघटनांनी केला आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीसह वैद्यकीय कक्ष, जागरुक संघ आदींनी याची दखल घेत थेट पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. या सभेत जादूटोणा आणि अंधश्रद्धांना खतपाणी घातले जात असल्याचा काहींचा आरोप आहे तर काहींचे म्हणणे आहे की, येथे व्यक्तींचे धर्मांतरण केले जात आहे.
 
अंनिसने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पेठे नगर, नाशिक येथे ” चंगाई ” सभेच्या नावाखाली अंधश्रद्धेच्या माध्यमातून अज्ञानी, अगतिक, असाध्य रोगाने पिडलेल्या व्यक्तींना फसवून, त्यांचे आर्थिक व मानसिक शोषण होत असलेल्या भोंदूगिरीचा प्रकार जागरुक नागरिकांनी उघडकीस आणला आहे. त्याबाबत त्यांनी आपल्या पोलिस स्टेशनमध्ये या भोंदूविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निवेदनही दिले आहे. महाराष्ट्र अंनिसतर्फे आम्ही या जागृक नागरिकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. आम्ही या निवेदनाद्वारे आपणास नम्र विनंती करतो की ,सदर भोंदूबुवाची सखोल चौकशी करून, त्याच्याकडे कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना, त्याने अवैज्ञानिक आणि अशास्त्रीय पद्धतीने आत्ता पर्यंत किती पिडींतांवर इलाज केले, कधीपासून तो इलाज करीत आहे, कशाप्रकारे इलाज करतो, त्यात किती लोक फसले गेले ,त्यातून लोकांच्या शारीरिक, मानसिक आरोग्याशी त्याने कसा कसा खेळ केला, या भोंदूबुवा ला सहकार्य करणारे कोण, कोण आहेत, अशा विविध अंगाने चौकशी करून ,त्यांचे पुरावे आपण जमा करावेत, अशी विनंती आहे.
 
आपल्या देशाच्या घटनेने भारतीय नागरिकाला , त्याला पटेल ,आवडेल तो धर्म स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे स्वातंत्र्य जरूर दिलेले आहे. मात्र बळजबरीने कुणी, कुणाला धर्मांतर करण्याची सक्ती करू शकत नाही. मात्र, हा भोंदूबुवा एका विशिष्ट धर्माचा असून ,तो कोणाच्या तरी इशाऱ्यावर लोकांना धर्मांतरासाठी बळजबरी करतो की काय, याबाबतही सखोल चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे. म्हणून सदर भोंदूबुवाची सखोल चौकशी करून,ठोस पुरावे मिळवावेत आणि त्यांवर बोगस डॉक्टर विरोधी कायदा तसेच जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी, अशी या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती