“अजित पवार सकाळी बरोबर वेळेवर येतात”

गुरूवार, 25 ऑगस्ट 2022 (21:01 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केलेल्या भाषणात जोरदार टोले लगावत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी थेट पहाटेच्या शपथविधीचा किस्सा सांगितला. तसेच त्यावेळी अजित पवारांनी घाई केली, असा खोचक टोला लगावला.
 
एकनाथ शिंदे म्हणाले, “अजित पवारांनी मला श्रद्धा आणि सबुरीचाही सल्ला दिला आहे. मी कधी खोटं बोललो नाही आणि बोलणारही नाही. माझा तो स्वभाव नाही. आम्ही जे केलं ते उघडपणे केलं. आम्ही श्रद्धा आणि सबुरीनेच वागतो आहे. आमच्यावर बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद आहेत आणि आनंद दिघेंवर आमची श्रद्धा आहे.”
 
“अजित पवार सकाळी बरोबर वेळेवर येतात”
“तुमचं वागणं, वेळापत्रक याविषयी आम्ही सगळीकडे बोलत असतो. अजित पवार सकाळी बरोबर वेळेवर येतात. तुम्ही मला एकदा पुण्याला सकाळी आठ वाजता बोलावलं. आता आठ वाजता मी कसा येणार? मी झोपतोच पहाटे चार वाजता. तुमच्याबद्दल मला आदरही आहे,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती