महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला असून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या राजकारणामुळे महाराष्ट्र हादरलं आहे. राजकीय वर्तुळात या घटनेमुळे चर्चेला उधाण आलं आहे. आता ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याचे आवाहन करत फलक लावण्यात आले आहे.
मनसे कार्यकर्ते लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर लावले असून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या बॅनरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. " महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला ,राज साहेब, उद्धव साहेब आता तरी एकत्र या. संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे. महाराष्ट्र सैनिकाची कळकळीची विनंती. असे या बॅनर वर लिहिले आहे.
राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली नंतर अनेकांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले मात्र ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यास ठामपणे नकार दिला. आता महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या भूकंपामुळे शिवसेनेच्या भवनासमोर लावलेल्या बॅनर मध्ये ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.