अजित पवारांच्या बंडामुळे शरद पवारांचे ‘उद्धव ठाकरे’ झालेत का?

सोमवार, 3 जुलै 2023 (09:36 IST)
Sharad Pawar become Uddhav Thackeray  अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून सत्तेत सहभागी झाले आहेत. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी बंड केल्याचं सध्याचं चित्र आहे.
 
अजित पवारांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळालं असून, त्यांच्यासोबत छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, अनिल पाटील, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि धर्मरावबाबा आत्राम या 8 जणांना मंत्रिपदाची शपथ घेतली.
 
या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह काही आमदारही उपस्थित होते.
 
मात्र, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या प्रकाराला विरोध दर्शवलाय. अजित पवार आणि त्यांच्यासोबत सरकारमध्ये सहभागी झालेल्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नसल्याचं शरद पवार आणि जयंत पाटलांनी स्पष्ट केलंय.
 
एकीकडे अजित पवार ‘आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ म्हणून सत्तेत सहभागी झाल्याचा दावा करतायेत, तर दुसरीकडे शरद पवार आणि जयंत पाटील हे अजित पवारांचा हाच दावा खोडून काढतायेत.
 
एकूणच बरोबर वर्षभरापूर्वी शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर जी राजकीय गोंधळाची स्थिती झाली होती, तशीच काहीशी स्थिती आता राष्ट्रवादीत झाल्याचं दिसून येतंय. ही स्थिती पाहता, ‘अजित पवारांच्या बंडामुळे शरद पवारांचे उद्धव ठाकरे झालेत का?’ असा एक सहाजिक प्रश्न पडतो. याच प्रश्नाचा आढावा आपण या विश्लेषणात्मक बातमीतून घेणार आहोत.
 
तत्पूर्वी, अजित पवारांचं बंड, त्यानंतर आलेल्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. त्यानंतर या राजकीय घटनांमधून निघणारा अर्थ, हे आपण कायद्याचे अभ्यासक आणि राजकीय विश्लेषक यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
 
अजित पवारांचा दावा : ‘पक्ष म्हणूनच सत्तेत’
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ या वरिष्ठ नेत्यांसोबत पत्रकार परिषद घेतली.
 
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, “आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. यापुढेही आपण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच आणि घड्याळ या चिन्हावरच निवडणुकीत उतरणार आहोत.
 
“आज आम्ही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे, त्यामध्येही काही सहकाऱ्यांना संधी मिळेल. देश आणि राज्याच्या परिस्थितीचा विचार करता आपण विकासाला महत्त्व दिलं पाहिजे, असं माझं आणि सहकाऱ्यांचं मत आलं. त्यामुळे आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत.”
 
तसंच, अजित पवार म्हणाले की, “राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक घटकाला न्याय देणं गरजेचं आहे. आम्हाला अनेक वर्षांचा प्रशासनाचा अनुभव आहे. त्याचा उपयोग सरकारला होईल. सोबतच पक्ष अधिक मजबुतीने पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे.”
 
अजित पवारांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ म्हणूनच सत्तेत सहभागाचा दावा केला असला, तरी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं तसं मत नसल्याचं दिसून आलंय.
 
शरद पवारांचा दावा : ‘हे सगळं पक्षाच्या धोरणांविरोधात’
अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत, अजित पवारांच्या बंडाला पक्षाचा आणि आपला पाठिंबा नसल्याचं स्पष्ट केलं.
 
शरद पवार म्हणाले की, “आमच्या काही सहकाऱ्यांनी पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. येत्या तारखेला मी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यामध्ये काही प्रश्नांचा विचार करणार होतो. पण त्यापूर्वीच काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि आम्हीच पक्ष आहोत.
 
“पण माझं स्पष्ट मत असं आहे की पक्षातील विशेषतः विधीमंडळातील सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली, याचं चित्र पुढील दोन-तीन दिवसांत लोकांसमोर येईल.
 
“ज्या नेत्यांची नावे आली आहेत, त्यापैकी काहींनी आजच मला संपर्क साधून आम्हाला याठिकाणी निमंत्रित केलं आणि सह्या घेतल्या आहेत, पण आमची भूमिका वेगळी आहे, असा खुलासा केलेला आहे.”
 
तसंच, शरद पवार पुढे म्हणाले की, “पक्षाचं नाव घेऊन कुणी काय भूमिका घेतली, याचं भांडण आम्ही करणार नाही. लोकांची भूमिका आमच्यासोबत कशी राहील, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
 
“ज्यांच्याशी संघर्षाची आणि विरोधाची भूमिका आम्ही घेतली, आज त्यांच्यासोबत आम्ही सहभागी झालो तर लोक अस्वस्थ होतील. त्यांची अस्वस्थता थांबवायची असेल, तर संघटनेची बांधणी पुन्हा करावी लागेल.
 
“पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी नेत्यांची पदावर नेमणूक केलेली आहे. पक्षाच्या चौकटीबाहेर गेलेल्यांवर कारवाई करण्यात येईल.”
 
ही गुगली नसून, दरोडा आहे, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.
 
शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही अजित पवारांच्या बंडाला विरोध दर्शवला.
 
जयंत पाटलांचा दावा : ‘पक्षाच्या मान्यतेशिवाय शपथविधी’
अजित पवारांसोबत गेलेल्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नव्हते. अजित पवार आणि त्यांच्या गटाचा शपथविधी पार पडल्यानंतर, जयंत पाटील यांनी ट्विटरवर शरद पवारांसोबत फोटो शेअर करत, ‘आम्ही पवारसाहेबांसोबत’ असं म्हणत अजित पवारांच्या बंडाला एकप्रकारे विरोधच केला.
 
त्यानंतर जयंत पाटलांनी जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुख या दोन वरिष्ठ नेत्यांसोबत पक्षाच्या प्रदेश कार्यालयातून पत्रकार परिषद घेतली.
 
“ज्या 9 सदस्यांनी शपथ घेतलीय, पक्षाच्या धोरणाच्या विरोधात जाऊन, त्यांनीच पलिकडे पाऊल टाकलाय. उरलेल्या आमदारांना मी दोष देणार नाही. त्यातले बरेच आमदार आम्हालाही भेटतायेत. त्या सर्वांची नक्की भूमिका काय आहे, हे समोर आल्यावर आम्हाला विचार करावा लागेल. राष्ट्रवादीचा भाजपच्या सरकारला पाठिंबा नाही. जे शपथ घेऊन मंत्री झालेत, त्यांनाही आमच्या पक्षाचा पाठिंबा नाहीय,” अशा शब्दात जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
 
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, “आमच्या पक्षाच्या काही विधानसभा सदस्यांनी मंत्रिमंडळात जाण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय. पक्षाच्या मान्यतेशिवाय सत्तारुढ पक्षाकडे जाऊन शपथविधीचा कार्यक्रम झालाय. झालेल्या घटनेचा महाराष्ट्रातले कार्यकर्ते निषेध करतायेत. आम्ही नेते आणि कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबत आहेत.”
 
जयंत पाटील पुढे म्हणाले की, “आज शपथविधी झाला. त्यांच्या कशावर सह्या घेतल्या, हे आम्हाला माहित नाही. पण त्यातल्या अनेकांनी शरद पवारांशी बोलून आम्ही गोंधळलेलो होतो, असं सांगितलंय.”
 
शरद पवारांच्या पत्रकार परिषदेमुळे हे स्पष्ट झालंय की, शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठलाही पाठिंबा नाहीय, असंही जयंत पाटील म्हणाले.
 
तसंच, यावेळी जयंत पाटलांनी सांगितलं की, गटनेता म्हणून पक्षाच्या विरोधी पक्षनेता आणि प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड यांची नेमणूक मी केलीय.
 
जयंत पाटलांनी यावेळी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचीही घोषणा केलीय. येत्या पाच तारखेला मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलीय.
 
पक्ष कुठल्या पवारांकडे?
भारतीय राज्यघटनेचे अभ्यासक डॉ. उल्हास बापट यांच्या मते, “अजित पवारांच्या बंडाची घटना ही पूर्णपणे अनपेक्षित होती. यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जे घडलं, तसंच आता घडल्याचं दिसतंय. मात्र, तेव्हाचाच प्रश्न पुन्हा उभा राहतो की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांकडे आहे की अजित पवारांकडे?
 
“आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की, राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष वेगवेगळे असतात. पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले विधिमंडळ पक्षात असतात. सध्या तेच अजित पवारांसोबत गेलेले दिसतायेत.
 
“त्यातही येणाऱ्या काही दिवसांमध्ये निवडून आलेले सदस्यही शरद पवारांकडे परत आले आणि अजित पवारांसोबत गेलेल्यांची संख्या दोन-तृतीयांश संख्येपेक्षा कमी झाली, तर अजित पवारांच्या गटावर पक्षांतरबंदी कायदा लागू शकतो. मात्र, येत्या काही दिवसात काय होतंय, यावर हे सर्व अवलंबून आहे.”
 
उल्हास बापट पुढे असंही म्हणाले की, “जर हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टात आणि निवडणूक आयोगाकडे गेलं, तर मग तिथे कायद्याची आणि आकडेवारीचीच भाषा समजली जाईल. मात्र, अंतिमत: हे सर्व जनतेच्या कोर्टातच येणार आहे आणि त्यासाठी वर्षभरावर निवडणुका आहेतत.”
 
याच मुद्द्यावर बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसमधील या बंडामुळे पक्षात कुठला राजकीय पेच निर्माण होतो आणि हा पेच कोर्टाची पायरी चढतो का, हे येत्या दोन-तीन दिवसात स्पष्ट होईल. कारण कोण कुणाच्या बाजूनं आहे, हे येत्या दोन-तीन दिवसांत कळेल.”
 
तसंच, देशपांडे पुढे म्हणाले की, “आता अजित पवारांनी केलेल्या बंडाची मुळं पवारांनी नेतृत्त्वबदलाच्या केलेल्या हालचाली आणि निर्णयांमध्येच असल्याचं दिसून येतं. कारण त्यानंतरच अजित पवारांच्या हालचाली वाढल्याचं दिसून येतं.”
 
“आता अजित पवारांनी पक्षच बळकावलाय की केवळ बंड केलंय, हे येत्या काही दिवसात कळेल, त्यामुळे आगामी घडामोडी कशा घडतात, हे आपल्याल पाहावं लागेल,” असं जयंत पाटील म्हणाले.
 
दरम्यान, एक गोष्ट निश्चित की, सध्या घडणाऱ्या घटना या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या आहेत. त्याचा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील सरकारवर कुठलाही परिणाम होणार नाही. कारण हे सरकार बहुमतात आहे. अजित पवार आणि त्यांचे समर्थक आमदार, हे अतिरिक्त पाठिंबा असल्यासारखं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती