क्षुल्लक कारणासाठी शिवसेना-भाजपा युतीत मिठाचा खडा

शनिवार, 10 जून 2023 (07:38 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा उमेदवारीवर आक्षेप घेतला जात आहे. कल्याणमध्ये भाजपाच्याच मर्जीच्या उमेदवाराला तिकीट मिळेल, अशी ठाम भूमिका स्थानिक भाजपानं घेतली आहे. “कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपा कार्यकर्ते सांगतील तोच उमेदवार मान्य केला जाईल. अन्य कोणता उमेदवार सहन केला जाणार नाही”, अशी भूमिका भाजपाच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शुक्रवारी (०८ जून) घेण्यात आली आहे. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.
 
यावर आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. श्रीकांत शिंदे म्हणाले, मी हे वाक्य ऐकलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं. मला वाटतं कल्याण लोकसभेचा उमेदवार कोण असेल याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेतला जाईल. जो उमेदवार योग्य असेल त्याला उमेदवारी दिली जाईल. भाजपा-शिवसेनेची युती झाली ती वेगळ्या विचारांवर झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका विचाराने ही युती केली आणि मग सरकार स्थापन केलं.
 
श्रीकांत शिंदे म्हणाले, आपल्या राज्यातलं सरकार चांगलं काम करत आहे. परंतु कुठल्या तरी एका क्षुल्लक कारणावरून, कुठल्या तरी वरिष्ट पोलीस निरिक्षकावर कारवाई होत नाही तोवर हे ठराव करतात की, शिवसेनेला पाठिंबा द्यायचा नाही. त्याचबरोबर कल्याण लोकसभेचा उमेदवार आम्ही ठरवू असंही म्हणतात. ही आव्हानं त्यांनी विचारपूर्वक केली पाहिजेत. आम्हाला आव्हान देण्याचं काम या लोकांनी करू नये. कारण या ठिकाणी शिंदे साहेबांनी १० महिन्यांपूर्वी जे केलं ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वात केलं. याचाही विचार त्यांनी केला पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी ते पाऊल उचललं नसतं तर काय परिणाम झाले असते याचा विचार त्यांनी केला पाहिजे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती