त्यांना माणसांची पारखच नव्हती, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला

सोमवार, 30 जानेवारी 2023 (08:04 IST)
कोरोना वाढला की त्याचा परिणाम महाराष्ट्रावर व्हायचा. मात्र, आम्ही आलो आणि सर्व निर्बंध हटविले. जे २०१९ मध्ये व्हायला पाहिजे होते ते आम्ही सहा महिन्यांपूर्वी केले. शिवसेना -भाजप युती ही काळाची गरज आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. भोसरी येथे इंद्रायणी थडी जत्रेचा रविवारी (दि. २९) समारोप झाला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
 
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दोन -अडीच वर्षे सगळेच दबकून बसले होते. मात्र, आम्ही सर्व निर्बंध हटविल्याने सगळं मोठ्या उत्साहात सुरू झाले. त्यापूर्वी इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, असे होते. मात्र, आता चिंता करू नका. तुमच्या केसालाही हात लावण्याची कोणी हिम्मत करणार नाही. राज्यातील हे डबल इंजिजनच सरकार वेगाने धावतंय. या सहा महिन्यांत सर्व घटकांसाठी निर्णय घेण्याचा आम्ही धडाका लावला आहे. कमी वेळात आम्हाला जास्त काम करायचे आहे. या सरकारच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत पिंपरी-चिंचवड शहराचा कायापालट करणार आहे.
 
भोसरीला पैलवानांचा इतिहास -
पैलवान काहीही करून शकतात. भोसरीला पैलवानांचा इतिहास आहे. पैलवान महेश लांडगे हे उमेदवारी मिळावी म्हणून माझ्याकडे आले होते. त्यावेळी मी पक्षाकडे शब्द टाकला होता. मात्र, त्यांना माणसांची पारखच नव्हती, असे म्हणून नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती