या बाबत मिळालेली माहिती अशी की,ओमकार मोरेश्वर देशमुख (२०, रा.भालगुल ता. सुधागड, रायगड), ऋषिकेश निळकंठ लोखंडे ( २४, रा. सर्वोदयालिला सोसायटी, कल्याण) व यश जयेश चव्हाण ( २१ रा. बोईसर जि. पालघर) हे तिघेजण त्यांच्याकडील हीरो कंपनीच्या एक्सप्लस 200 या स्पोर्ट्स मोटारसायकलने वाकण-पाली मार्गावरुन अतिवेगाने ट्रिपल सीट प्रवास करत होते. वजरोली गावाच्या हद्दीत जंगली पिर दर्ग्याच्या पुढे एका वळणावर आले असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटारसायकल रस्त्यावर घसरुन कडेला असलेल्या लोखंडी संरक्षण कठड्याला जोरदार धडक दिली.
यामध्ये दोघेजण रस्त्यावर व एक जण संरक्षण कठड्याच्या पलीकडे जोरात आदळले. हा अपघात इतका भीषण होता की, तिघांच्याही डोक्याला, हाताला तसेच पायाला गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या. यामध्ये ओमकार देशमुख व ऋषिकेश लोखंडे यांचा जागीच मृत्यू झाला तर जय चव्हाण याला उपचारासाठी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन येत असताना वाटेतच त्याचाही मृत्यू झाला.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे सहायक फौजदार श्रीराम खेडेकर यांनी नागोठणे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिसांसह अपघातस्थळी धाव घेतली. तसेच तरुणांचे मृतदेह नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. याठिकाणी तिघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.