महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एका 25 वर्षीय मजुराचा 'रोड रोलर'ने चिरडून मृत्यू झाला. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. कोनगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना मंगळवारी दुपारी 2 च्या सुमारास घडली, जेव्हा मजूर प्रकाशकुमार लड्डू महंतो हे दुपारचे जेवण करून भिवंडी शहरातील एका बांधकाम साईटजवळ पार्क केलेल्या 'रोड रोलर' समोर झोपले होते.
त्यांनी सांगितले की 'रोड रोलर' चालकाने न बघता वाहन चालवले, त्यामुळे कामगाराचा चिरडून मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह भिवंडी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रकाशकुमार यांच्या एका सहकाऱ्याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 'रोड रोलर' चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे, असे पोलिसांनी सांगितले. अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.