राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. नदी पात्रांना पूर आला आहे. धरणे भरली आहे. राज्यात पुणे आणि नाशिकात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. पुण्यातील भिडेपूल पाण्याखाली गेला आहे. नाशिकात देखील पावसाच्या दमदार हजेरीमुळे गोदावरी नदी पात्रात पूर आला आहे.
आज 15 जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड, पुणे सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी अति मुसळधार पाऊस येणार असून या भागात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
हवामान विभागाने रायगड, पुणे, रत्नागिरी,सातारा आणि सांगलीत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून या जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे तर बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे