नाशिक : सध्या विद्यार्थी बारावीच्या परीक्षेच्या टेन्शन मध्ये असताना त्यांचे टेन्शन आणखी वाढवणारी घटना घडली आहे. वर्गात इंग्रजीचा पहिलाच पेपर सुरू असताना अज्ञात व्यक्तीने बाहेरून विद्यार्थ्यांचे ११ मोबाईल लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना नाशिकरोड परिसरातील के. जी महेता हायस्कूल, बिटको कॉलेज, जयराम भाई हायस्कुल येथे घडली आहे. विद्यार्थी पेपरमध्ये गुंग असताना बाहेर हा प्रकार घडला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिकची माहिती अशी की, सध्या राज्यभरात बारावीची परीक्षा सुरू असून विद्यार्थी आधीच त्या व्यापात आहेत. काल मंगळवारी विद्यार्थ्यांचा इंग्रजीचा पहिलाच पेपर झाला. मात्र पेपर झाल्यानंतर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इंग्रजीचा पेपर सकाळी 11 वाजता होता. बिटको महाविद्यालय, के. जी. मेहता हायस्कूल, जयरामभाई स्कूल येथे पेपर देण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कॉपी विरहित परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयाकडून त्यांच्या बॅग वर्गात नेण्यास परवानगी नव्हती.
त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी त्यांचे मोबाईल बॅगमध्ये ठेवून ती बॅग दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. तर काही विद्यार्थ्यांनी वह्या पुस्तके व मोबाईल असलेली बॅग शाळा, महाविद्यालयाच्या बाहेर ठेवली होती. दुपारी दोन वाजता पेपर सुटल्यानंतर विद्यार्थी बॅगा व दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली बॅग घेण्यासाठी गेले. त्यावेळी काही विद्यार्थ्यांचे ११ मोबाईल चोरीस गेल्याचे लक्षात आले.
यानंतर विद्यार्थांनी थेट पोलीस ठाणे गाठले, या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बारावीला परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला येताना सोबत मोबाईल आणू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.