'ग्रंथ तुमच्या दारी’ या पुस्तक पेटी योजनेचा मुंबईतील ‘ ७५ वी ग्रंथ पेटी उद्घाटन सोहळा ’ रविवारी (ता. ४ ऑक्टोबर) सायंकाळी ५.०० वाजता, चिकूवाडी जॉगर्स पार्क, बोरीवली (पश्चिम) येथे होणार आहे. या सोहळ्यास कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री श्री. मधुमंगेश कर्णिक, प्रतिष्ठानचे विश्वस्त विनायक रानडे आणि वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्री बापूसाहेब गायकवाड उपस्थित राहणार आहेत.
तरुण पिढीत सोशल नेटवर्किंग साइट्स, ईमेल, चॅटिंग तसेच टीव्ही, मोबाइल आदींचा अतिवापर होत आहे. त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन व्हावे तसेच परस्परांत संवाद वाढावा या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येतो.
नाशिकचे कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांची 'ग्रंथ तुमच्या दारी' ही ग्रंथ पेटी वाचनालय योजना आहे. मुंबई पश्चिम विभागातर्फे, पश्चिम शहर आणि उपनगरात ही योजना राबविली जाते. पाच ग्रंथ पेट्यांनी गोरेगाव येथे सुरू झालेली ही योजना तीन वर्षांच्या अवधीत पंधरा पटींपेक्षा जास्त वाढून ७५ वर पोहोचली आहे. स्वेच्छेने काम करणारे अनेक स्वयंसेवकांमुळे हा उपक्रम वाढीस लागला आहे. शाळा, सोसायट्यांची कार्यालये, दवाखाने, मंदिरे, घरे, अंगण वाडी अशा ठिकाणी वाचकांच्या सोयीसाठी या पेट्या ठेवल्या आहेत.
या सोहळ्या निमित्ताने श्री. व सौ. उमा विसुभाउ बापट यांच्या प्रसिध्द ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्व रसिकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी घनश्याम देटके (९८१९११८३६५) यांच्याशी संपर्क साधावा.