मोदी सरकारविरुध्द अण्णांचा एल्गार

गुरूवार, 29 जानेवारी 2015 (06:58 IST)
‘नव्या सरकारला काम करण्यास वेळ दिला पाहिजे. त्यानुसार आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला काम  करण्यास मुदत दिली होती. मात्र, या सरकारनेही भ्रष्टाचार नियंत्रणासह अन्य मुद्दय़ांवरही जनतेची निराशाच केली आहे. त्यामुळे लोकपाल विधेयकासह अन्य मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलन करावे लागेल,’असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला.
 
विविध कार्यक्रमांसाठी दीर्घ दौरा केल्यानंतर हजारे नुकतेच राळेगणसिद्धीमध्ये परत आले आहेत. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला. ते म्हणाले,‘निवडणुकीत मोदी आणि भाजपने जनतेला बरीच आश्वासने दिली होती. त्यामुळे या सरकारकडून काही ठोस कामे होतील, निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा होती. त्यामुळे नव्या सरकारविरुद्ध लगेच काही आंदोलन न करता त्यांना काम  करण्यास पुरेशी मुदत दिली. मात्र, या काळात सरकारने घेतलेले निर्णय आणि दुर्लक्ष केलेले विषय पाहता भ्रष्टाचार हटविण्यासंबंधी हे सरकारही गंभीर दिसून येत नाही. 
 
प्रचार करताना परदेशातील भारतीयांचा काळा पैसा परत आणून, त्यातून प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करू वगैरे घोषणा केल्या होत्या. त्या प्रत्यक्षात आलेल्या नाहीत. भ्रष्टाचार हटविण्यासाठी उपयुक्त ठरणार्‍या लोकपालसंबंधीही या सरकारने काहीच भूमिका घेतलेली नाही.

वेबदुनिया वर वाचा