धनाढ्य जीएसबीचा 300 कोटींचा विमा

यंदाही आपली परंपरा कायम राखत मुंबईतील सर्वात धनाढ्य समजल्या जाणार्‍या जीएसबी सेवा (गौड सारस्वत ब्राह्मण) गणेश मंडळाने श्री गणेशमूर्ती मंडप इतर साहित्याचा तब्बल 300 कोटींचा विमा उतरवला आहे. जीएसबी मंडळाच्या गणेश मूर्तीमध्ये 68 किलो सोने आणि 327 किलो चांदी आहे. तसेच मंडप तयार करण्यासाठी 315 किलो चांदीचा वापर करण्यात आला आहे. 

गेल्या वर्षी मंडपासाठी 298 किलो चांदीचा वापर करण्यात आला होता. मंडळाने या वर्षी मूर्तीचे हात, पाय आणि कान सोन्याचे बनवले आहेत. गणपतीची उंची 14.5 फूट असून मूर्ती इको-फ्रेंडली आहे. मंडपाची सजावट ही यंदा ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ आणि स्वच्छ भारत अभियान संकल्पनेवर आधारित आहे. मंडप अतिशय कल्पकतेने सजवण्यात आला आहे, अशी माहिती जीएसबी गणेश मंडळाचे प्रवक्ते सतीश नायक यांनी दिली. 
 
गणेशोत्सवाच्याकाळात दर्शनासाठी येणारे भाविक कोटय़वधी रुपये दान करतात. गेल्या वर्षी दररोज सुमारे दीड लाख भाविकांनी जीएसबी गणपतीचे दर्शन घेतले. भाविकांकडून मिळणार्‍या दानाचा उपयोग वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांसाठी करण्यात येतो. यात शिक्षण, आरोग्य आणि वैयक्तिक रूपातही मदत करण्यात येते. गेल्या वर्षी मंडळाने मुख्यमंत्री सहायता निधीला लाख रुपये देणगी स्वरूपात दिले होते.

वेबदुनिया वर वाचा