डॉ.दाभोळकरांचे मारेकरी अजूनही मोकाटच

बुधवार, 20 ऑगस्ट 2014 (10:45 IST)
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (बुधवार) एक वर्ष पूर्ण झाले. तरी त्यांची हत्या करणारे अजूनही मोकाटच आहे. पुणे पोलिसांसह सीबीआयचे हे मोठे अपयश असल्याचे बोलले जात आहे.   तरीसुद्धा तपास यंत्रणेला त्यांच्या मारेक-यांचा शोध लागला नाही.  
 
पुणे पोलिसांनी सर्व साधनसामग्रीचा वापर करत वर्षभर शोध मोहिम राबवली. परंतु, हत्येचा कोणताच पुरावा न मिळाल्याने अखेर पोलिसांचा तपास थंडावला. त्यामुळे हायकोर्टाने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) तपास हस्तांतरित केला. सीबीआय याप्रकरणी मागील तीन महिन्यांपासून तपास करत आहे. मात्र, अद्यापही त्यांच्या हाती काही ठोस पुरावा उपलब्ध झाला नाही.  
 
डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी न सापडल्याने अंनिस कार्यकर्ते उद्विग्न झाले आहेत. पुण्यात बुधवारी डॉ. दाभोलकरांना आदरांजली अर्पण केली जाणार आहे. एक वर्ष पूर्ण होऊनही कुठलाही तपास न लागल्याने कार्यकर्त्यांनी ‘निषेध दिन जागरण’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मुंबईसह राज्यातील सर्व जिल्ह्यांत आदरांजली कार्यक्रम होणार असून पंजाब, गोवा, बेळगाव, बंगळुरू, केरळ, तेलंगण आदी राज्यांतही आदरांजलीचे कार्यक्रम पार पडणार आहेत. 
 
दरम्यान, डॉ.दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराजवळील वि.रा.शिंदे पुलावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. 

वेबदुनिया वर वाचा