कुंभमेळ्यासाठी केंद्राची भरीव मदत मिळवा

मंगळवार, 16 डिसेंबर 2014 (10:17 IST)
नासिकमध्ये पुढील वर्षी होणार्‍या कुंभमेळची कामे करण्यासाठी आता फक्त काही महिन्यांचाच अवधी आहे तेव्हा त्याबाबतचे निर्णय लवकर घ्या. नासिक महानगरपालिकेकडे सातशे रुपये देखील खर्चासाठी नाहीत आणि सातशे कोटी रुपयांच्या कामांचे आदेश देण्यात आले आहेत या बाबीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेत लक्ष वेधले. 
 
राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना भुजबळ म्हणाले की, आताच या सर्व कामांसाठी पैसा आणावा लागेल. केंद्र सरकारने या आधी जिथे कुंभमेळे झाले तिथे हजार बाराशे कोटी रुपये दिले आहेत. आता तुमचे सरकार केंद्रात आहे. हे कुंभमेळ्याचे काम हिंदुत्वाचेच काम आहे. जर गोदावरी नदीत जाणारे गटारीचे पाणी तुम्ही नाही थांबवलेत तर तिथे होणारा कुंभमेळाच रद्द करण्याचे आदेश आम्ही देऊ असे उच्च न्यायालयाने बजावलेले आहे. तसे झाले तर ती मोठीच नामुष्की ओढवेल या कडेही भुजबळांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की, दोन कोटी भाविक कुंभमेळ्यात सहभागी होतात तेव्हा या सर्व प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्या. 
 
आणखी दोन तीन महिन्यांनंतर तुम्ही करू म्हटलेत तरी कामे करता येणार नाहीत कारण मग ती वेळेत पूर्ण होऊ शकणार नाहीत, असेही भुजबळांनी बजावले. 

वेबदुनिया वर वाचा