आमदार कर्डिलेंना वर्षाची सक्तमजुरी

मंगळवार, 8 जुलै 2014 (10:50 IST)
आमदार शिवाजी कर्डिले यांना जिल्हा कोर्टाने एक वर्ष सक्तमजुरी, हजार रुपये दंड ठोठावला आहे. कर्डिले यांना मतदान केंद्रात गोंधळ घातल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. कर्डिलेसोबत माजी जिल्हा परिषद सदस्य रघुनाथ झिने यांना सहा महिने सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड ठोठावला. कोर्टाने दोघांनाही लगेचच वैयक्तिक जामिनावर सुटकाही केली.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान हा प्रकार झाला होता. नगर तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर 25 मे 2002 ला मतदान प्रक्रिया सुरू होती. तेथे मतदान करण्यासाठी सरस्वती पालवे आल्या होत्या. त्या बोगस मतदार असल्याचे समजून झिने यांनी पालवे यांच्याकडील मतपत्रिका हिसकावली. त्याच वेळी आमदार कर्डिलेही मतदान कक्षात आले. त्यांनी गोंधळ करीत शिवीगाळ व दमदाटी करून मतदान प्रक्रिया बंद पाडली. याप्रकरणी झिने व कर्डिलेंविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. 

वेबदुनिया वर वाचा