संभाजीराजेंची ठरवून कोंडी; फडणवीस यांचा शिवसेना, शरद पवारवर हल्लाबोल

शनिवार, 28 मे 2022 (08:48 IST)
आधी पाठिंबा द्यायचा आणि ऩंतर तो काढून घ्यायचा, अशा पद्धतीने छत्रपती संभाजीराजे यांची ठरवून कोंडी करण्यात आली, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर आणि शिवसेनेवर टीका केली. ते म्हणाले की, शरद पवार यांनी आधी संभाजीराजेने पाठिंब्यासाठी घोषणा केली आणि नंतर त्यांनी घूमजाव करत पाठिंबा काढून घेतला. ही ठरवून कोंडी असल्याचा आरोप त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर केला.
 
मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंब्याचा शब्द दिला होता. नंतर तो मोडला, असे सांगताना राजे यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणतेही स्मारक असेल तेथे आपण दोघांनी जायचे दोघांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करायचे आणि छत्रपती संभाजी राजे खोटे बोलत असतील तर तुम्ही सांगायचे, असे आव्हान संभाजी राजे यांनी दिले.
 
शरद पवार यांनी आधी छत्रपती संभाजी राजे यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा जाहीर केला. तसेच शिल्लक राहिलेली मते दिली जातील, असेही सांगितले. मात्र शिवसेनेकडून दुसरा उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर होताच त्यांनी आपली भूमिका बदलली. याबाबत पवार यांनी कारण दिले आहे की, दोन वर्षांपूर्वी राज्यसभेची त्यांच्याकडे एक जागा असताना शिवसेनेकडून एक अधिक जागा मागून घेतली. त्याचवेळी पुढच्या वेळी दोन जागा शिवसेनेला देता येतील, असेही कबूल केले होते. आता शिवसेनेने दोन उमेदवार उभे केल्याने जादा मते शिवसेनेच्या उमेदवाराशिवाय इतर कोणालाही देऊ शकत नाही. शिवसेना जो उमेदवार देईल त्यालाच ती मते देण्यात येतील. तेथे शिवसेनेचा दुसरा उमेदवार छत्रपती संभाजी राजे असतील तरी त्यांना ती मते मिळतील, असे पवार म्हणाले होते. त्यामुळे अपक्ष लढणाऱया संभाजीराजेंची राष्ट्रवादीनेही कोंडी केल्याचे फडणवीस म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती