राज्यसभेच्या निवडणुकीतून संभाजीराजेंची माघार

शुक्रवार, 27 मे 2022 (14:52 IST)
राज्यसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारीवरून राज्यात सध्या घमासान सुरू आहे. राज्यातल्या सहा जागांसाठी ही निवडणूक होत आहे. शिवसेनेने दिलेली ऑफर नाकारल्यानंतर संभाजीराजे यांनी आपण खासदारकीच्या निवडणुकीला सामोरं जाणार नसल्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे मंत्री, नेत्यांबद्दल खुलासे केले आहेत. सुरुवातीलाच संभाजीराजेंनी महाराष्ट्रातल्या जनतेचेही आभार मानले आहे. राज्यसभा निवडणुकीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द फिरवला. या गोष्टीचं मला प्रचंड वाईट वाटत आहे, असे संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी सांगितले.माझी ताकद म्हणजे ४२ आमदार नव्हे तर जनता संभाजीराजे छत्रपती शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
राज्यसभा निवडणुकीबद्दलची भूमिका स्पष्ट करताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, शिवसेनेनं माझ्यासमोर पक्ष प्रवेशाची अट कायम ठेवली होती. पण मी स्पष्ट शब्दात नकार दिला होता, असे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले. छत्रपतीला आम्हाला बाजूला ठेवायचे नाही. बरोबर ठेवायचे आहे. त्यामुळे तुम्ही शिवसेनेच प्रवेश करावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यासमोर ठेवला होता ,असे संभाजीराजे यांनी सांगितले. मी राज्यसभा निवडणुकीला सामोरं जाणार नाही, पण ही माझी माघार नसून स्वाभिमान असल्याचे संभाजीराजे म्हणाले.

उद्धव ठाकरे आणि माझ्यात काय संभाषण झाले, हे मला जाहीर करायचे नव्हते. पण मला आज बोलावे लागतेय. मी सांगतोय त्यापैकी एकही शब्द खोटा असेल तर मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवछत्रपतींच्या कोणत्याही स्मारकावर यायला तयार आहे. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभं राहून उद्धव ठाकरे यांनी सांगावे की, मी खोटं बोलत आहे, असे आव्हान संभाजीराजे यांनी दिले. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी आपण राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर केले.
 
उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला मला भेटण्यासाठी दोन खासदारांना पाठवले होते. मुंबईतील ओबेरॉय हॉटेलमध्ये आमची बैठक झाली होती. त्यावेळी मी शिवसेनेत प्रवेश करावा, असा प्रस्ताव खासदारांनी मांडला. तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे नकार दिला. मी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणूनच लढणार, असे मी त्यांना सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला. त्यांनी मला वर्षा बंगल्यावर भेटायला बोलावले. मी मुख्यमंत्रीपदाचा मान राखून उद्धव ठाकरे यांना भेटायला गेलो. त्यावेळी आमच्यात तीन मुद्द्यांवर चर्चा झाली. तेव्हाही उद्धव ठाकरे यांनी मला, 'छत्रपती आमच्यासोबत हवेत', अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हादेखील मी अपक्ष म्हणून लढणारच, असे स्पष्ट केल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती