रस्त्याच्या कडेला दुचाकी लावून बोलत असताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रक ने दिलेल्या धडक मुळे झालेल्या अपघातात आईसह मुलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात घडली आहे. जिजाबाई केरुबाई पळसकर(52) आणि ताराबाई महादू साबळे (73) असे या मयत झालेल्या आई आणि लेकीची नावे आहेत. तर विलास महादू साबळे(47) हे गंभीर जखमी झाले आहेत.
अधिक माहितीनुसार, जखमी विलास साबळे आणि त्यांची आई ताराबाई साबळे हे टाकली हाजी येथून दुचाकीने जात असताना त्यांना त्यांची बहीण जिजाबाई पळसकर या पायी चालताना दिसल्या. विलास यांनी त्यांना पाहून आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि दोघी मायलेकी आपसात बोलत होत्या. त्याचवेळी पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रक ने तिघांना धडक दिली. या अपघातात ताराबाई यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले तर जिजाबाई या गंभीर जखमी झाल्या त्यांना स्थानिकांनी तातडीने शिरूरच्या रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.