शहरातील व्होकार्ड हॉस्पिटल मध्ये ६८ वर्षीय व्यक्ती कोरोनाने बाधित असल्याने उपचारासाठी दाखल झाली होती. गेल्या तीन दिवसांपासून या रुग्णावरील उपचार बंद करण्यात आले होते.रुग्णाला दिलेल्या बिलात जादा रक्कम आकारली होती त्यामुळे ती रक्कम रुग्णाने न दिल्यामुळे तो रुग्ण बरा झाल्यानंतर ही त्याला घरी सोडत नव्हते या सर्व बाबत माझ्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर व्होकार्ड हॉस्पिटलच्या कोरोना अतिदक्षता विभागात पी.पी.ई.किट घालून माझ्यासोबत मुख्य लेखा परीक्षक बी.जे सोनकांबळे व डॉ.पावसकर यांच्या पथकाने पाहणी केली.
त्या रुग्णाची समक्ष भेट घेऊन त्याच्याशी चर्चा करून त्याची तक्रार समजावून घेतली त्यावेळी व्होकार्ड हॉस्पिटलचे डॉ. निलेश गुमारदार व डॉ. नीलिमा जोशी हे उपस्थित होते. तक्रारदार रुग्णाने व्होकार्ड प्रशासनाबाबत केलेल्या गंभीर तक्रारीची दखल घेऊन वाढीव आकारलेली रक्कम कमी करण्याच्या सूचना व्होकार्ड प्रशासनास देण्यात आल्या तसेच त्वरित त्या रुग्णास घरी सोडण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. तसेच या गंभीर तक्रारीबाबत आरोग्य वैद्यकीय विभागास हॉस्पिटलवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ आणि शासनाच्या प्रचलित नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त तथा सी बी आर एस सिस्टिमचे प्रमुख सुरेश खाडे यांनी दिली.