मुंबई : किती रूग्ण आढळल्यानंतर सोसायटी ठरणार मायक्रो - कंटेन्मेंट झोन?

मंगळवार, 6 एप्रिल 2021 (21:13 IST)
मुंबईतला कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करण्यात येत असून त्यासाठीची नियमावली मुंबई महापालिकेने जाहीर केली आहे.
 
मायक्रो कंटेन्मेंट झोनसाठीचे नियम
5 किंवा त्यापेक्षा अधिक अॅक्टिव्ह कोव्हिड -19 रुग्ण असणाऱ्या को-ऑपरेटिव्ह सोसायटीला 'मायक्रो - कंटेन्मेंट झोन' " ठरवलं जाईल आणि ही सोसायटी सील करण्यात येईल.
ही सोसायटी मायक्रो - कंटेन्मेंट झोन असल्याचा बोर्ड सोसायटीच्या गेटवर लावून बाहेरच्यांना आत येण्याची परवानगी नाकारण्यात यावी. सोसायटीमध्ये कोण येतं, कोण बाहेर जातं यावर सोसायटीने लक्ष ठेवावं.
यामध्ये काही चूक झाल्यास त्या सोसायटीला पहिल्यांदा बीएमसीकडून रु.10,000 चा दंड आकारला जाईल. यानंतर पुढच्या प्रत्येक चुकीसाठी 20,000 रुपयांचा दंड आकारला जाईल.
अशा प्रकारे सील करण्यात आलेल्या प्रत्येक बिल्डिंगच्या बाहेर एका पोलिसाची नेमणूक केली जाईल.
सोसायटीतल्या लोकांसाठी येणाऱ्या सर्व प्रकारच्या डिलीव्हरी - वर्तमान पत्र, खाद्यपदार्थ, जीवनावश्यक वस्तू यांची डिलीव्हरी सोसायटीच्या ऑफिसच्या पुढे देता येणार नाही. या गोष्टी पुढे त्या त्या व्यक्तीपर्यंत कशा पोहोचतील याची व्यवस्था सोसायटीने ठरवायची आहे.
सोसायटीचे सचिव वा अध्यक्ष आणि गेटवरील पोलिसांना सांगितल्याशिवाय कोणालाही बाहेर पडता येणार नाही. वैदयकीय आणीबाणी किंवा बोर्डाची परीक्षा यासाठीच मायक्रो कंटेन्मेंट झोनबाहेर पडता येईल.
लक्षणं न दिसणारे - एसिम्प्टमॅटिक पॉझिटिव्ह पेशंट असणारी घरं सील करणं बंधनकारक आहे. ही सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी असेल. त्यामध्ये चूक झाल्यास ती सोसायटीची चूक मानली जाईल आणि यासाठी बीएमसीकडून पहिल्यांदा 10,000 रुपये तर पुढच्या चुकांसाठी प्रत्येकी 20,000 रुपये दंड सोसायटीला आकारला जाईल.
या मायक्रो - कंटेन्मेंट झोनच्या आत कोण येतं वा कोण बाहेर पडतं यावर सोसायटीच्या दरवाज्यापाशी असणाऱ्या पोलिसाचं नियंत्रण असेल.
सोसायटीकडून नियमांची अंमलबजावणी योग्य होते का, यावर पोलिसांचं लक्ष असेल. आणि त्यामध्ये हयगय होत असल्यास पोलिसांकडून महापालिकेला कळवलं जाईल.
एसिम्प्टमॅटिक असणाऱ्या वा होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांनी घरातंच रहावं. त्यांनी घराबाहेर पडू नये. असे रुग्ण घराबाहेर पडल्यास त्यांच्या विरुद्ध वॉर्ड अधिकाऱ्याद्वारे FIR दाखल करण्यात येईल.
या मायक्रो - कंटेन्मेंट झोनमधल्या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यासाठी लॅबकडून घरी येणाऱ्या व्यक्तीला योग्य खबरदारी घेतल्यानंतरच परवानगी देण्यात येईल.
या सगळ्यांनी सरकारच्या सूचनेप्रमाणे आरोग्यसेतू अॅप डाऊनलोड करावं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती