सप्टेंबरमध्ये कमी झालेली कोव्हिड 19ची रुग्णसंख्या एप्रिलमध्ये का वाढली?
मंगळवार, 6 एप्रिल 2021 (20:58 IST)
-सरोज सिंह
गेल्या 24 तासात भारतात कोव्हिड 19चे 96,982 रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. हीच संख्या सोमवार (5 एप्रिल) रोजी 1,03,558 होती. कोरोनाच्या जागतिक साथीदरम्यानची एका दिवसातली ही आतापर्यंतची सर्वात मोठी आकडेवारी असल्याचं सांगितलं जातंय.
गेल्या 24 तासांमध्ये देशभरात कोव्हिड 19मुळे 446 मृत्यू झाल्याचं आरोग्य मंत्रालयाने 6 एप्रिलच्या सकाळी म्हटलं.
रविवारी 4 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परिस्थितीचा आढावा घेतला होता. महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये आरोग्य मंत्रालयाचं पथक पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
आकडे का वाढतायत?
कोरोना संसर्गाचे आकडे इतक्या वेगाने का वाढतायत? सप्टेंबर अखेरपासून आतापर्यंत असं काय बदललं? खरंतर आता लस आलेली असताना, संसर्गाचे आकडे कमी होणं अपेक्षित असताना, ही वाढ होण्यामागे काय कारणं आहेत?
पहिलं कारण : कोरोना संसर्ग न झालेली मोठी लोकसंख्या
डॉ. शाहिद जमील देशातले प्रसिद्ध व्हायरलॉजिस्ट (विषाणूंमुळे होणाऱ्या रोगांचे तज्ज्ञ) आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितलं, " जर लोकसंख्येतल्या एका मोठ्या गटाला कोव्हिड 19 झालेला नसेल, तर कोव्हिड 19च्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ पहायला मिळेल. लोकसंख्येतला मोठा गट कोव्हिड 19 पासून अजूनपर्यंत बचावल्याचं देशामध्ये आतापर्यंत झालेल्या सिरो सर्व्हेंमधून आम्हाला आढळलं आहे.
या लोकांना आतापर्यंत इन्फेक्शन झालेलं नव्हतं. म्हणजे आता मुंबईतल्या प्रायव्हेट सोसायट्यांमध्ये रहाणाऱ्यांमध्ये आता सर्वाधिक केसेस आढळत आहेत. खासगी हॉस्पिटल्समध्ये लोक जास्त दाखल होतायत आणि सरकारी हॉस्पिटल्समधले बेड्स अजूनही रिकामे आहेत. यावरून हे लक्षात येतं काही भारतात अजूनही अशी मोठी लोकसंख्या आहे जी धोक्यामध्ये येऊ शकते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये येणाऱ्यांत याच लोकांचं प्रमाण अधिक आहे."
सफदरजंग हॉस्पिटलमधल्या कम्युनिटी मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. जुगल किशोर सिरो सर्व्हेच्या मदतीने ही गोष्ट समजवतात.
डॉ. जुगल किशोर म्हणाले, " ज्या ज्या ठिकाणी सिरो सर्व्हे झाला, त्या प्रत्येक भागातली आकडेवारी वेगवेगळी होती. म्हणजे कुठे 50 टक्के लोकांना कोव्हिड होऊन गेला होता, तर कुठे 20 टक्के तर कुठे 30 टक्के. गावांमध्ये हे प्रमाण आणखीन थोडं कमी होतं. लोकांना संसर्गापासून वाचवण्यासाठी सरकारने त्यांना घरी बसवून ठेवलं. त्यांच्या घराबाहेर पडण्यावर निर्बंध घातले. पण आतापर्यंत संसर्ग झाला नाही म्हणजे यापुढेही होणार नाही, असं नाही. ज्यावेळी सगळ्यांच्या शरीरात अँटीबॉडीज निर्माण होतील, तेव्हाच संसर्ग आटोक्यात येईल.
ज्यावेळी लोकसंख्येच्या 60 ते 70 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार होतात, आणि उरलेले 40 ते 30 टक्के जण घरीच राहतात, त्याचवेळी 'हर्ड इम्युनिटी' काम करते. पण जेव्हा संसर्ग न झालेले 40 ते 30 टक्के जण प्रवास करू लागतात, त्यांचं लोकांना भेटणं वाढतं, तेव्हा 'हर्ड इम्युनिटी'चा फायदा होत नाही. सिरो सर्व्हे बरोबर होते. पण जे 40 - 30 टक्के जण आजवर संसर्गापासून दूर होते, त्यांचा वावर - भेटीगाठी वाढल्याने ही परिस्थिती निर्माण झालीय."
दुसरं कारण : लोकांनी खबरदारी न घेणं
वारंवार हात धुणं, दोन लोकांमध्ये दोन फुटांचं अंतर ठेवणं आणि मास्क वापरणं, हे कोव्हिड 19चा संसर्ग होऊ नये, यासाठीचं योग्य वर्तन आहे. पण लस आल्यानंतर हे सगळं करण्याची गरज नसल्याचं सगळ्यांना वाटलं. यामध्ये लस घेतलेल्यांचा आणि न घेतलेल्यांचाही समावेश आहे.
बाजारपेठा उघडल्या, 5 राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत, कुंभमेळा होतोय, लोकांनी ऑफिसला जायला सुरुवात केली आहे. कोव्हिड 19 होऊ नये यासाठी जी खबरदारी घेणं गरजेचं आहे, त्याच पालन होत नसल्याचं निवडणूक होत असलेल्या ठिकाणांच्या दृश्यांमध्यून उघड दिसतंय. यामध्ये नेत्यांचाही समावेश आहे. याचमुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग दुसऱ्यांदा जास्त आक्रमक दिसतोय.
बीबीसीशी बोलताना डॉ. जुगल किशोर यांनी सांगितलं, "या प्रकारच्या साथीच्या आजारांमध्ये रुग्णसंख्येची वाढ दोन गोष्टींवर अवलंबून असते -
1. अशा साथीदरम्यान सामान्य नागरिक त्यांच्या वागणुकीमध्ये कसा बदल घडवतात आणि
2. व्हायरसचं वागणं कसं बदलतं.
लोक आपल्या वागण्यामध्ये बदल घडवू शकतात. सुरुवातीला लोकांनी हे बदल काही प्रमाणात केलेही. मास्क वापरायला सुरुवात केली, घरातून बाहेर पडणं कमी केलं, हात धुवायला सुरुवात केली. पण आता ते सगळं सोडून दिलं."
तिसरं कारण : झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमागची म्युटंटची भूमिका
व्हायरसच्या वागण्यात झालेला बदल हेही संसर्ग झपाट्याने पसरण्यामागचं आणखी एक कारण असल्याचं डॉ. जुगल सांगतात. व्हायरसमध्ये जे बदल झाले आहेत, ज्याला म्युटंट म्हटलं जातंय, त्यामुळे हा विषाणू झपाट्याने पसरण्यासाठी अधिक सक्षम झालाय.
जरी या गोष्टीबद्दल सखोल अभ्यास झालेला नसला, तर जे लहान जिनोमिक अभ्यास झाले आहेत, त्यावरून भारतात युके स्ट्रेन आणि दक्षिण आफ्रिकेतला स्ट्रेन आल्याचं सिद्ध झालंय. यापेक्षा वेगळं आणखी एक म्युटेशन महाराष्ट्रातल्या सँपलमध्ये आढळलेलं आहे आणि याबद्दल अभ्यास होणं गरजेचं आहे.
पंजाबात आढळलेल्या प्रकरणांमध्ये म्युटंट व्हायरसचा समावेश असल्याचं खुद्द सरकारने मान्य केलंय. व्हायरसमध्ये बदल होऊन तयार झालेला व्हेरियंट जास्त वेगाने संसर्ग पसरवत असल्याचं युकेमध्येही पहायला मिळालं.
चौथं कारण : वाढता R नंबर
डॉ. टी जेकब जॉन हे वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमधले व्हायरॉलॉजीचे निवृत्त प्राध्यापक आहेत. कोरोनाची पहिली लाट आणि दुसरी लाट यांमध्ये मोठा फरक असून तो स्पष्टपणे दिसून येत असल्याचं ते सांगतात. पहिली लाट असताना लॉकडाऊन आणि लोक घरी परतूनही संसर्गाचे आकडे दर आठवड्याला कमी वेगाने वाढले.
पण यावेळी आलेख पाहिल्यास, रुग्णसंख्या अचानक मोठ्या वेगाने वाढलेली आहे. याचाच अर्थ संसर्गाचा दर ज्याला R नंबर म्हटलं जातं, तो झपाट्याने वाढतोय.
R नंबर म्हणजे विषाणूचा रिप्रॉडक्शन नंबर (Reproduction Number). हा विषाणूच्या पुनरुत्पादनाचा आकडा असतो. डॉ. जॉन यांच्यामते, "पहिल्या लाटेदरम्यान हा R नंबर 2 ते 3च्या मधे होता. पण दुसऱ्या लाटेमध्ये हा 3 ते 4च्या दरम्यान गेलाय. दुसरी लाट ही गेल्या वर्षीच्या व्हायरसच्या तुलनेने वेगळी असल्याचं यातून दिसतं."
ते पुढे सांगतात, "कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या आकडेवारीवरून असा अंदाज लावला जातोय की त्या लाटेमध्ये 60 टक्के लोकांना हा आजार झाला होता आणि 40 % या संसर्गापासून वाचले होते. आता त्या 40 टक्के लोकांना दुसऱ्या लाटेत कोरोना होतोय, म्हणून रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय. पीकही लवकर येईल आणि जेव्हा हा आलेख खाली येईल, तो देखील याच वेगाने येईल, असा अंदाज सध्या वर्तवण्यात येतोय."
पण मग या रुग्णसंख्येमध्ये पुन्हा संसर्ग झालेली प्रकरणं नाहीत, आणि उरलेल्या लोकांनाच कोरोना होतोय असं म्हणता येईल का? याबाबत सखोल अभ्यास गरजेचा असून तेव्हाच काही सांगता येणार असल्याचं डॉक्टर जॉन म्हणतात.
पाचवं कारण : शहरांमध्ये परतणारे लोक?
गावी परत गेलेल्यांचं शहरांकडे परतणं, हे यामागचं एक कारण असल्याचं काही जाणकार सांगतात. डॉ. जुगल यांनाही हे वाटतं.
त्यांच्यामते लॉकडाऊनदरम्यान दिल्ली, महाराष्ट्र आणि पंजाब या राज्यांमधून मोठ्या संख्येने लोक आपापल्या राज्यात परत गेले होते. सगळे व्यवहार सुरू झाल्यानंतर, लस आल्यामुळे हे लोक पुन्हा शहरांकडे येऊ लागले. शहरांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याचं हे देखील एक कारण असू शकतं.
मग आधीच्या पहिल्या लाटेप्रमाणेच या दुसऱ्या लाटेसमोरही भारत सरकार लाचार आणि असहाय्य आहे का? वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी काय उपाय केले जात आहे? पुन्हा लॉकडाऊन लावणं हा यावरचा उपाय आहे का?
3 तज्ज्ञ डॉक्टर्सना आम्ही हे प्रश्न विचारले.
लसीकरण धोरणांमध्ये बदल
या संसर्गाला तोंड देण्यासाठी भारत सरकारने लसीकरणासाठीच्या धोरणांमध्ये बदल करणं गरजेचं असल्याचं डॉ. जमील म्हणतात. "भारतामध्ये फक्त 4.8 टक्के लोकसंख्येला लशीचा पहिला डोस देण्यात आलाय आणि 0.7 टक्के लोकसंख्येने लशीचा दुसरा डोस घेतलाय. भारत अजूनही लसीकरणासाठीच्या उद्दिष्टांपासून बराच मागे आहे. म्हणूनच अजून लशीचा परिणाम भारताच्या लोकसंख्येवर दिसत नाहीये."
यासाठी ते इस्त्रायलचं उदाहरण देतात. इस्त्रायलमध्ये 65पेक्षा जास्त वयोगटातल्या 75 ते 80 टक्के लोकांना कोरोनाची लस देण्यात आलीय. यामुळे त्या वयोगटातल्या लोकांचं हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचं वा गंभीर संसर्ग होण्याचे प्रकार जवळपास नगण्य झाले आहेत.
म्हणून सरकारने लसीकरण धोरणांमध्ये बदल करणं गरजेचं असल्याचं ते सांगतात. "जे महाराष्ट्रात होतंय, ते नागालँडमध्ये होत नाहीये. महाराष्ट्रात फक्त 45 वर्षांपेक्षा मोठ्या लोकांनाच लस देऊन काही साध्य होणार नाही. महाराष्ट्र आणि पंजाबात रुग्णसंख्या जिथे जास्त वाढतेय, तिथे लसीकरण सर्वांसाठी खुलं करायला हवं."
पण असं करण्यासाठी लशीचा पुरवठा कसा होणार, लस कशी देणार यासाठीची धोरणंही ठरवणं गरजेचं असल्याचं ते म्हणतात.
भारताने इतर देशांना लस देणं बंद करावं का?
याचा निर्णय केंद्र सरकारने घ्यायला हवा, असं डॉक्टर जुगल म्हणतात.
सर्वांसाठी लसीकरण खुलं करण्याबाबत ते सांगतात, "45 वर्षांपेक्षा जास्त वयासाठीच्या लोकांसाठीचं उद्दिष्ट भारत सरकारने पूर्ण केलेलं नाही. म्हणून सर्वांसाठी लसीकरण खुलं केल्यास अडचणी वाढू शकतात. सगळे ताकदवान लोक लस आधी घेतील, आणि गरजवंत मागे राहतील. म्हणूनच वयोगटानुसार उद्दिष्ट ठेवणं जास्त योग्य."
काही प्रमाणात लॉकडाऊन हा उपाय ठरेल का?
24 मार्च 2020 रोजी भारतात पूर्ण लॉकडाऊन लावण्यात आला. त्यावेळी भारतात कोरोनाचे एकूण 500 रुग्णही नव्हते. या धोरणावर अनेक प्रकारची टीका झाली. मग लॉकडाऊन लावण्यामागची कारणं दिली गेली.
कोरोना व्हायरसच्या संसर्गाची साखळी तोडणं आणि आरोग्य यंत्रणेला याचा मुकाबला कराण्यासाठी सज्ज करणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं सांगण्यात आलं. आजही भारताच्या काही राज्यांतल्या काही शहरांमध्ये अंशतः लॉकडाऊन करून निर्बंध घालण्यात येत आहेत. हे धोरण योग्य आहे का?
डॉ. जमील म्हणतात, "महाराष्ट्र किंवा देशातल्या इतर राज्यांच्या शहरांमध्ये जो लॉकडाऊन किंवा नाईट कर्फ्यू आणि तर निर्बंध पहायला मिळतायत, लोकांनी नियम स्वीकारून पाळावे असं आहे. त्यांनी गरजेपुरतंच बाहेर पडावं, उगाचंच मजा म्हणून बाहेर पडू नये, मास्क वापरावा आणि सुरक्षित अंतर ठेवावं, हा यामागचा हेतू आहे."
ज्या ठिकाणी रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय तिथे निर्बंध लावण्यात यायला हवेत. पण गेलं वर्षभर भारतवासीयांनी जो लॉकडाऊन पाहिला, तसा लावून काहीही साध्य होणार नाही. ज्याप्रमाणे कंटेन्मेट झोन तयार करण्याचं धोरण करण्यात आलं होतं, तसं सरकारने फोकस करून निर्बंध लावून संसर्ग एका ठिकाणी रोखण्याचे प्रयत्न करावेत.
अंशतः निर्बंध लावण्याची बाब डॉ. जुगल यांनाही पटते. ते देखील मायक्रो लेव्हल म्हणजे लहान पातळीवरील निर्बंध लावण्याबद्दल बोलतात. डॉ. जॉन म्हणतात की ज्या प्रमाणे जंगलात आग लागल्यास संपूर्ण जंगलात पाणी न फवारता फक्त जिथे आग लागलीय त्यावर पाणी मारलं जातं, त्याचप्रमाणे जिथे आग जास्त पसरली असेल, तिथली परिस्थिती पहिल्यांदा आटोक्यात आणायला हवी.