राज्य उत्पादन शुल्क, तळेगांव विभाग पथकाने केलेल्या कारवाईत तळेगाव दाभाडे शहराच्या हद्दीत ८७ लाख ८९ हजार ५२० रूपये किंमतीच्या गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यासह एकूण १ कोटी ५ लक्ष ७ हजार ५२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर, हॉटेल शांताई समोर रोडवर सापळा रचून गोवा राज्य निर्मीत आणि केवळ गोवा राज्यात विक्रीस असलेले विदेशी मद्याचा साठा घेऊन जाणाऱ्या भारत बेंझ कंपनीच्या ट्रक क्र.एम एच ४६ एफ – ६१३८ या क्रमांकाचा ट्रक जप्त करुन कारवाई करण्यात आली.
या ट्रकमध्ये रिअल व्हिस्की ७५० मि.ली चे ४ हजार १६४ सीलबंद बाटल्या व रिअल व्हिस्की १८० मि.ली चे ५ हजार ७६० सीलबंद बाटल्या, रॉयल ब्ल्यू व्हिस्की ७५० मि.ली चे ९ हजार ६०० सीलबंद बाटल्या असे विदेशी मद्याचे एकुण १ हजार २६७ खोके जप्त करण्यात आले. मद्य आणि वाहनासह इतर जप्त मुद्देमालाची किंमत १ कोटी ५ लक्ष ७ हजार ५२० रुपये इतकी आहे. वाहन चालक प्रवीण परमेश्वर पवार वय २४ वर्षे, रा. मु.पो. तांबोळे, ता. मोहोळ व देविदास विकास भोसले वय-२९ वर्षे रा. मु.पो. खवणी, मोहोळ जि. सोलापूर यांना अटक करुन त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क चरणसिंह राजपूत यांनी दिली आहे.