पुणे : 17 वर्षीय मुलीवर वडील, आजोबा, काकांकडून लैंगिक अत्याचार

शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 (16:16 IST)
Author,मानसी देशपांडे,
मूळची उत्तर प्रदेशच्या पण सध्या पुण्यात शिक्षण घेत असलेल्या एका एका 17 वर्षीच्या मुलीसोबत घडलेला धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
 
काॅलेजमधल्या विशाखा समितीच्या सदस्यांकडून समुपदेशन सुरू असताना तिने तिच्यासोबत घडत असलेला प्रकार सांगितला.
 
मुलीवर तिचे आजोबा, काका आणि वडिल यांनी लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं.
 
याप्रकरणी पुणे पोलिसांनी मुलीच्या वडिलांना अटक केली आहे. तसंच तिच्या आजोबा आणि काकांना अटक करण्यासाठी पुणे पोलिसांची एक टीम उत्तर प्रदेशला रवाना झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काॅलेजमध्ये विशाखा समितीच्या सदस्यांसमोर या मुलीने ही माहिती सांगितली.
 
“17 नोव्हेंबर रोजी पोलिस स्टेशन मध्ये एफआयआर दाखल झाली. त्यानुसार, पिडीत मुलीवर तिचे वडील, काका यांनी लैंगिक अत्याचार केले आणि तिचे आजोबा यांनी तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं.
 
सदरची मुलगी ही पुण्यातल्या एका काॅलेजमध्ये शिक्षण घेते. काॅलेजच्या विशाखा समितीच्या काही सदस्यांसमोर तिच्या आपबीती विषयी माहीती दिली,” असं विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दत्तात्रय भापकर यांनी सांगितलं.
 
मागच्या काही वर्षांपासूनच तिच्यावर लैंगिक अत्याचार केले जात होते.
 
“ही मुलगी 11-12 वर्षाची असताना या मुलीवर तिच्या काकांनी अत्याचार केला होता. ही माहिती तिच्या आजोबांना मिळाल्यानंतर आजोबांनीही तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
 
यानंतर 2018 मध्ये मुलगी आणि तिचे आई वडील पुण्यात आले. 2018 मध्ये मुलीने घडलेल्या प्रकाराबद्दल वडिलांना माहिती दिली. तर वडिलांनीही त्याचा गैरफायदा घेऊन 2018 पासून तिच्यावर अत्याचार केले.
 
मुलीला विश्वासात घेऊन बोलल्यानंतर तिने पोलिसांकडे ही सगळी माहीती दिली. याचा सखोल तपास करण्यात येतोय. मुलीच्या वडिलांना अटक केलेली आहे. त्यांना 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे.
 
तिचे चुलते आणि आजोबा हे तिच्या मुळ गावी उत्तर प्रदेश मध्ये आहेत. त्यांना अटक करण्यासाठी टीम पाठवलेली आहे,” असं विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दत्तात्रय भापकर यांनी सांगितलं.
 
जवळच्या नात्यांमधल्या लोकांनी लैंगिक अत्याचार केल्याची ही पहिलीच घटना नाही. मार्च महिन्यात याच प्रकारची एक घटना उघडकीला आली होती.
 
मूळचं बिहारचं कुटूंब असेलेलेया एका 11 वर्षीय मुलीवर तिचा भाऊ, वडील, आजोबा आणि काकाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता.
 
शाळेमध्ये ‘गूड टच , बॅड टच’ चा वर्ग सुरु असताना या मुलीने तिच्या सोबत घडलेल्या प्रकार सांगितला. यानंतर आरोपींवर गुन्हेही दाखल करण्यात आले होते.
Published By -Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती