पुणे : वीज चोरीवर आता ड्रोनची नजर

शनिवार, 2 सप्टेंबर 2023 (08:13 IST)
पुणे :वीजबिलाच्या थकबाकीसाठी बंद केलेल्या मीटरला बायपास करून उच्चदाबाच्या रोहित्राला थेट मोठी केबल जोडून वीजचोरी करणा-या चोराचा महावितरण केडगाव विभागाने ड्रोनच्या सहाय्याने छडा लावला. मुकेश अगरवाल असे या वीजचोराचे नाव असून त्यास महावितरणने २ कोटी ४ लाखांचा दंड ठोठावला. या प्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
सणसवाडी येथे मुकेश ओमप्रकाश अगरवाल (रा. अग्रसेन सोसायटी, कोरेगाव पार्क, पुणे) यांच्या मालकीच्या तीन वेगवेगळ््या कंपन्या आहेत. पैकी मे. थर्मोलाईट पॅकेजिंग इंडिया प्रा. लि. व मे. प्रकाश करुगेटेडे पुणे प्रा. लि. या दोन उच्चदाबाचे तर मे. भगवान ट्यूब प्रा. लि. हे लघुदाब ग्राहक आहेत. तिन्ही कंपन्या एकाच आवारात व शेजारी-शेजारी आहेत. यामध्ये प्रामुख्याने थर्माकोल आणि पुठ्ठा बनविण्याचे काम होते. मे. थर्मोलाईट पॅकेजिंग इंडिया प्रा. लि या ग्राहक जोडणीचा वीजपुरवठा थकबाकीमुळे कायमस्वरूपी बंद केला होता तर इतर दोन वीज जोडण्यांचा वीजपुरवठादेखील थकबाकीच्या कारणास्तव तात्पुरता बंद आहे.
 
महावितरणने वीजपुरवठा बंद केलेला असतानाही वीजपुरवठ्यासाठी उभारण्यात आलेला अतिउच्चदाब रोहित्रातून थेट वीजपुरवठा सुरू केल्याची माहिती केडगावचे कार्यकारी अभियंता संदीप दरवडे यांना खब-यांमार्फत मिळाली. ही वीजचोरी मोठी असल्याने आणि संबंधित ग्राहकाने गेटवर बंदोबस्त लावून आत जाण्यास मज्जाव केल्याने दरवडे यांनी ही बाब मुख्य अभियंता सुनिल पावडे यांच्या कानावर घातली.
 

Edited By - Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती