यंदाच्या कमी पाऊसमानाचा गंभीर फटका राज्याला बसण्याची चिन्हे आहेत. पावसामुळे वीज निर्मितीचा वेग मंदावला आहे. यामुळे विजेची निर्मिती व पुरवठा यात मोठी तफावत निर्माण झाली आहे. परिणामी राज्यावर आपत्कालीन लोडशेडिंग म्हणजे भारनियमन करण्याची वेळ आली आहे. राज्यातील नागरिकांना आता दररोज अर्धा ते २ तासांच्या भारनियमनाला सामोरे जावे लागेल.
यंदा राज्यात कमी पाऊसमान झाले आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. ही मागणी पूर्ण करण्यात महावितरणला अपयश येत आहे. त्यामुळे राज्यातील काही ठिकाणी अर्धा ते २ तासापर्यंतचे भारनियमन सुरू करण्यात आले आहे. कमी पाऊसमानामुळे शेतक-यांकडून सिंचनासाठी होणारा पाण्याचा उपसा वाढला आहे. परिणामी विजेची मागणी वाढून तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात आपत्कालीन लोडशेडिंग करण्यात येत आहे, अशी माहिती महावितरणच्या एका अधिका-याने दिली. राज्यात काही भागात अर्धा तास ते २ तासांपर्यंत लोडशेडिंग केली जात आहे. विजेची वाढीव मागणी कमी झाली किंवा पाऊस झाला, तर लोडशेडिंग आपसूकच बंद होईल, असे या अधिका-याने सांगितले.
सद्यस्थितीत विजेची कमाल मागणी २६ हजार मेगावॅटपेक्षा जास्त वाढली आहे. सामान्यत: ऑगस्ट महिन्यात होणा-या पावसामुळे कृषी क्षेत्रातील विजेची मागणी कमी होते. पण यंदा ही मागणी कमी झाली नाही. उलट वाढत्या उकाड्यामुळे एसी, कुलर अजून सुरू आहेत. त्यामुळे विजेची मागणी वाढली आहे, असे महावितरणाच्या अधिका-यांनी सांगितले.