वाढ दिवसाच्या पार्टी वरून दोन पक्षात झालेल्या वादात गोळीबार केला त्यात एकाचा मृत्यू झाला. सदर घटना गुरुवारी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास देहूरोड येथे आंबेडकरनगर येथे घडली आहे.
विक्रम गुरव स्वामी रेड्डी असे या मृत्युमुखी व्यक्तीचे नाव आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. या बाबत नंदकिशोर रामपवित्र यादव यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी नंदकिशोर आपल्या भावाच्या मुलीचा वाढदिवस रस्त्याच्या कडेला मंडप टाकून साजरा करत असताना जेवण सुरु होते. आरोपी मंडपात जेवण सुरु असताना तिथे आले आणि रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्यावरून आक्षेप घेतला. आणि नंदकिशोर यांना खुर्ची मारली.
संभाषणा दरम्यान आरोपी आणि नंदकिशोर यांच्यात बाचाबाची सुरु झाली. नंदकिशोर यांचे मित्र विक्रम गुरव रेड्डी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.या दरम्यान एका आरोपीने गोळीबार केला आणि गोळी थेट विक्रम यांच्या छातीत लागली. ते या गोळीबारात गंभीर जखमी झाले. त्यांना एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तिथून त्यांना पिंपरीतील रुग्णालयात रेफर करण्यात आले उपचाराधीन असता रात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
देहूरोड पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले की आरोपींची ओळख पटली असून त्यांना अटक करण्यासाठी छापे टाकले जात आहे. ही घटना वैयक्तिक वैमनस्यातून घडली की घटनास्थळी घडलेला वाद होता याचा तपास पोलीस करत आहे.