MPSC उत्तीर्ण दर्शना पवारची हत्याच, राजगडाच्या पायथ्याशी सापडलेला मृतदेह

मंगळवार, 20 जून 2023 (15:27 IST)
पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील राजगडाच्या पायथ्याजवळ 18 जून 2023 रोजी 26 वर्षीय दर्शना पवार यांचा मृतदेह सापडला. दर्शना पवार मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी होत्या. दर्शनानं MPSC परीक्षेत यश मिळवलं होतं.
 
ज्या मित्रासोबत दर्शना पवार राजगडाजवळ फिरायला गेल्या होत्या, त्या मित्राचा अजूनही शोध न लागल्याने दर्शनाच्या मृत्यूमागचं गुढ अजून वाढलं आहे.
 
पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?
वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी सांगितलं की, दर्शना पवार यांच्या मृतदेहाचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला आहे.
 
मनोज पवार यांच्या माहितीनुसार, "पोस्टमार्टममध्ये डोक्यावर जखम असल्याचे पुरावे समोर आले आहेत. तसंच, शरीरावर जखमाही आढळल्या आहेत. या प्राथमिक अहवालावरुन तिची हत्या झाली असावी, असं स्पष्ट होतंय. त्यामुळे आम्ही अज्ञात व्यक्तीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास सुरु आहे."
 
"आमचं संपूर्ण पोलीस ठाणे या प्रकरणाच्या तपासावर काम करतंय. तिच्या मित्राचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. हत्येचा गुन्हा दाखल केला असला तरीही तो कुणी केला आणि का केला यासंदर्भात आम्ही तपास करतोय," अशीही माहिती मनोज पवार यांनी दिली.
 
नेमकं झालं काय?
दर्शना पवार यांचे वडील दत्ता पवार यांनी पोलीस जबाबात दिलेल्या माहितीनुसार, दर्शना 9 जूनला पुण्यात एका खासगी कोचिंग क्लासच्या सत्कार समारंभात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर त्या कुटूंबीयांच्या संपर्कात होत्या. 10 जूननंतर त्यांचा कुटूंबीयांशी संपर्क झाला नाही. त्यामुळे 12 जूनला त्यांचे कुटुंबीय पुण्यात आले आणि कोचिंग क्लासमध्ये जाऊन चौकशी केली.
 
कोचिंग क्लासमधून कुटुंबीयांना असं कळलं की, दर्शना त्यांच्या एका मित्रासोबत सिंहगड आणि राजगड फिरायला गेल्या होत्या.
 
यानंतर कुटुंबीयांनी सिंहगड पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. या सगळ्या घडामोडींनंतर 18 जून रोजी दर्शनाचा मृतदेह सापडला.
 
दर्शना यांचा मृतदेह कसा सापडला?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वेल्हे तालुक्यातील गुंजवणी गावातील स्थानिकांमध्ये काहीतरी कुजल्यासारखा वास येत असल्याची कुजबूज सुरु झाली. स्थानिकांनी पोलीस पाटलांनी कळवलं आणि त्यानंतर ही माहिती वेल्हे पोलिसांपर्यंत आली.
 
जिथून वास येत होता, तिथे शोध घेतल्यावर एक मृतदेह सापडला.
 
वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक मनोज पवार यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, “रविवारी राजगडाच्या पायथ्याशी कुजलेला वास येत असल्याची माहिती मिळाली. शोध घेतल्यावर एक मृतदेह सापडला. मृतदेहाजवळ काही वस्तूही सापडल्या. त्यामध्ये फोन, बॅग अशा गोष्टींचा समावेश होता. सिंहगड पोलीस हद्दीत एक मिसिंग पर्सन तक्रार दाखल होती. त्यावरुन नातेवाईकांशी संपर्क साधला त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली."
 
"मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे. पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलाय. पुढचा तपास सुरु आहे,” अशी माहिती मनोज पवार यांनी दिली.
 
योग्य दिशेने तपास करुन दर्शनाला न्याय द्यावा - सुप्रिया सुळे
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेची दखल घेत, योग्य तपास करण्याची मागणी केलीय.
 


Published By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती