कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस झाला . दरम्यान, मनसे नेते वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट करत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. सरणाची राख निवली सुद्धा नसेल, तुम्ही तुमची मते कमी होतील म्हणून लगेच त्या-त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या.विधानसभेची निवडणूक होते, मग महापालिकेची का नाही? असा सवालही मोरे यांनी उपस्थित केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या या दोन्ही निवडणुकीबाबतची भूमिका स्पष्ट करणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच मनसे नेते वसंत मोरे यांनी वेगळी भूमिका घेत राज्य सरकारला महापालिका निवडणुकीवरुन इशारा दिल्याने राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे
मोरेंची फेसबुक पोस्ट
माझा शिंदे -फडणवीस सरकारला एक प्रश्न आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाचे २ आमदार नुकतेच मयत झाले.आजुन त्यांच्या सरणाची राख निवली सुद्धा नसेल, तर तुम्ही तुमची मते कमी होतील म्हणून लगेच त्या त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या.मग मागील एक वर्षापासून आमच्या शहराला कोणताही लोकप्रतिनिधी (नगरसेवक) नाही,प्रशासनाने शहराचे वाटोळे लावले आहे.विकास कामे ठप्प झाली आहेत. निधी नसल्यामळे नागरिकांना थोबाड दाखवू वाटत नाही. पुण्यातील आमदार,खासदारांनी जरा आमच्या चपलेत पाय घालून पहावे आणि हो जर कोणत्या पक्षाला सहनुभुती मिळेल म्हणून जर निवडणुका टाळत असताल तर तुमचा पराभव निश्चित समजा कारण, जो मनातून हारतो तो रणात काय जिंकणार.