ॲमेझॉन अंबरनाथ तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात दाखल होणार

शनिवार, 21 डिसेंबर 2024 (20:51 IST)
अंबरनाथच्या वैविध्यपूर्ण एमआयडीसीमध्ये शेकडो राष्ट्रीय आणि अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्या आहेत. आता जगप्रसिद्ध ॲमेझॉन अंबरनाथ तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात दाखल होणार आहे. यासाठी ॲमेझॉन डेटा सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडने गेल्या महिन्यात लोढा समूहाकडून 450 कोटी रुपयांना 38 एकर जमीन खरेदी केली आहे.
 
या जमिनीवर ॲमेझॉन अंबरनाथमध्ये 38 एकरांवर डेटा सेंटर उभारणार आहे. अंबरनाथ निबंधक कार्यालयात ॲमेझॉनकडून 27 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने अंबरनाथ तालुक्यातील असोदे आणि बुरडूल गावात ही जमीन घेतली आहे. यामुळे भविष्यात डेटा सेंटरसाठी अंबरनाथची वेगळी ओळख निर्माण होईल आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

नुकताच या जमिनीचा व्यवहार अंबरनाथ उपनिबंधक कार्यालयात नोंदविण्यात आला आहे. अंबरनाथ आनंद नगर एमआयडीसीमध्ये अनेक नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या या भागात येण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी पाले येथील नवीन एमआयडीसीचा विस्तारही वेगाने करण्यात येत आहे. मुंबई आणि उपनगरात विशेषत: नवी मुंबईत अनेक डेटा सेंटर्स उभारली जात आहेत. जमिनीच्या उपलब्धतेमुळे अनेक डेटा सेंटर्स या क्षेत्रात येण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.

ॲमेझॉन वेब सर्विसेज (AWS) च्या विस्ताराचा एक भाग म्हणून, कंपनीने 2030 पर्यंत भारतात क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये $12.7 बिलियन (सुमारे 1 लाख कोटी) गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अंबरनाथमधील मुंबईच्या डेटा सेंटर मार्केटमध्ये ॲमेझॉनची ही दुसरी गुंतवणूक आहे. यापूर्वी 2023 मध्ये ॲमेझॉनने लार्सन अँड टुब्रोकडून पवईमध्ये 4 एकर जमीन 18 वर्षांसाठी लीजवर घेतली होती.
Edited By - Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती