पुणे : चिंचवडमधून नाना काटे महाविकास आघाडीचे उमेदवार

मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023 (10:34 IST)
चिंचवड पोटनिवडणुकीसाठी नाना काटे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत. चिंचवडसह कसबा पेठेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील होते. पण आता दोन्ही ठिकाणी उमेदवार देण्यात आल्याने निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे.
 
"चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. नाना काटे हे उमेदवार असतील. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे", असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सांगितलं.
 
चिंचवड पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि नाना काटे आमनेसामने असतील.
 
कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधान सभा विरोधी पक्ष नेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची त्यांनी मागणी केली आहे.
 
दुसरीकडे काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, "आम्ही उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत. निवडणूक बिनविरोध करण्याबाबत मला एकनाथ शिंदेंचा फोन आला होता. टिळक कुटुंबाला तिकीट मिळेल असं वाटत होतं पण ते मिळालं नाही."
 
"टिळकांच्या घरातील उमेदवाराला तिकीट दिले असते तर बिनविरोधाचा विचार केला असता. मी फडणावीसांशी बोलेन की टिळक परिवारावर अन्याय का केला?" असंही पटोले म्हणाले.
 
चिंचवडमध्ये महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस जागा लढेल, असंही पटोले यांनी सांगितलं.
 
भाजपाने कसबा पेठ मतदारसंघात हेमंत रासने यांना आणि चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
 
कसबा मतदारसंघातून भाजप आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडमधून भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या दोन जागा रिक्त झाल्या होत्या.
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करुन मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला पाठिंबाच दिला आहे. राज ठाकरे यांनी लिहिलं, "महाराष्ट्र विधानसभेच्या दोन आमदारांचं नुकतंच निधन झालं. या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. मी सुरुवातीपासून या मताचा आहे की जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो".
 
ते पुढे लिहितात, "अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो. अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एका उमद्या राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला दिलेली श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर जनता देखील सहानभूती दाखवेलच असं नाही".
 
"अंधेरी पूर्व विधानसभेच्या निवडणुकीत दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं. त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निवडणूक बिनविरोध होऊ दिली. आता पिंपरी चिंचवड आणि कसबा इथे पोटनिवडणुका आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्या सर्वांनी आहे. हीच नाही तर एकूणच अशा दु:खद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा", असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
 
हेमंत रासने पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत.
 
अश्विनी जगताप या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आहेत. त्या प्रतिभा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आहेत. पहिल्यांदाच निवडणूक लढवतील.
 
"एकेक टप्पा पूर्ण करत केंद्रीय संसदीय बोर्डाने चिंचवडच्या जागेसाठी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप तर कसबा पेठ मतदारसंघात हेमंत रासने यांची निवड केली आहे", असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
 
ते म्हणाले, "काल देवेंद्रजी आणि मी शैलेंद्र टिळक, कुणाल टिळक यांना भेटलो. पक्ष त्यांना योग्य स्थान देईल. सन्मानाचं स्थान देईल अशा प्रकारे आश्वस्त केलं. त्या दोघांनीही आम्ही पक्षाबरोबर एकनिष्ठ असू असं सांगितलं. टिळक कुटुंबीयांशी काल चर्चा केली. आताच्या वातावरणात ही निवडणूक जिंकणं यादृष्टीने त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करुनच हा निर्णय झाला आहे. शैलेंद्र टिळक यांचं नाव होतंच पण त्याबरोबरीने उदयोन्मुख चेहरा म्हणून कुणालचं नाव समोर होतं. प्रवक्ता म्हणून त्याचं नाव घोषित झालं आहे. पक्ष त्यांच्या पाठीशी असेल".
 
अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यासंदर्भात त्यांनी सांगितलं की, "जगतापांच्या कुटुंबात कोणताही वाद नव्हता. मोठ्या प्रमाणावर लोकांनी अशा वावड्या उठवल्या. लक्ष्मणभाऊंचा मुलगा वयाने लहान आहे. पण त्याने काल परिपक्वता दाखवत ट्वीट केलं. आमच्या कुटुंबातून कोणीही निवडणुकीला उभं राहिलं तर आम्ही सगळे त्याच्या पाठीशी असू असं त्याने सांगितलं. आमचं कुटुंब कोणीही तोडू शकणार नाही असं अतिशय समजूतदार ट्वीट त्याने केलं. शंकरभाऊ निवडणुकीचे प्रमुख असतील तर कसबा पेठ इथे माधुरी मिसाळ निवडणूक प्रमुख असतील",
 
दरम्यान या दोन्ही जागा बिनविरोध व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटून आवाहन करणार आहेत असं पाटील म्हणाले.
 
7 फेब्रुवारी हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. 10 फेब्रुवारी हा अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे. 27 फेब्रुवारीला मतदान होईल. यानंतर 2 मार्चला निकाल जाहीर करण्यात येईल.
 
यामुळे येत्या काही दिवसांतच राजकीय घडामोडींना वेग येऊन दोन्ही मतदारसंघांचे उमेदवार जाहीर होतील अशी शक्यता आहे. तोपर्यंत राजकीय गणिते कशी बदलतात हे बघणंही औत्सुक्याचं ठरेल.
 
कसबा मतदारसंघ
कसबा मतदारसंघ हा पुणे शहरात आहे. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघात येतो.
 
जुन्या पुणे शहरातला महत्त्वाचा भाग या मतदारसंघात येतो. यामध्ये पुण्यातील कसबा पेठ, शनिवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ, बुधवार पेठ, रास्ता पेठ, भवानी पेठ या भागांचा समावेश होतो.
 
पुण्यातील जुन्या बाजारपेठेचा भाग जसं की लक्ष्मी रोड, तुळशीबाग याच मतदारसंघात आहे.
 
1995 सालापासून भाजप नेते गिरिश बापट कसबा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत होते.
 
2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून गिरिश बापट यांना उमेदवारी देण्यात आली. ते पुण्याचे खासदार म्हणून निवडून आले.
 
गिरिश बापट यांच्या खासदार होण्यामुळे रिक्त झालेली कसबा पेठ मतदारसंघाच्या जागेतून 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत तेव्हा पुण्याच्या महापौर असलेल्या मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली.
 
कसबा मतदारसंघात मध्ये 2019 सालच्या निवडणुकीत एकूण 2 लाख 89 हजार 54 मतदार होते. या निवडणुकीत मुक्ता टिळक यांनी काँग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे यांचा 28 हजार 196 मतांनी पराभव केला.
 
या निवडणुकीत लोकमान्य टिळक यांच्या कुटुंबातील सदस्य मुक्ता टिळक आमदार म्हणून निवडून आल्या.
 
पण, पुढे काही काळाने त्यांना कर्करोगाचं निदान झालं. 57 व्या वर्षी 22 डिसेंबर 2022 रोजी त्यांचं कर्करोगाशी झुंज देताना निधन झालं. यामुळे आता कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.
 
पोटनिवडणूक जाहीर झाल्यावर कसब्यात भाजपकडून कोण उमेदवार असेल याची चर्चा सुरू झाली होती, अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो.
 
1995 पासून इथे भाजपचाच आमदार आहे. आमदारांच्या निधनानंतर पोटनिवडणूक बिनविरोध होते असा एक संकेत आहे.
 
चिंचवड मतदारसंघ
चिंचवडचे भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कर्करोगाने 3 जानेवारी 2023 रोजी निधन झालं. ते 59 वर्षांचे होते. ते सलग तीनवेळा चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले होते.
 
2009 साली लक्ष्मण जगताप अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2014 आणि 2019 साली भाजपकडून आमदार झाले.
 
चिंचवड मतदारसंघात 5 लाख 66 हजार 415 मतदार आहेत. 2019 साली लक्ष्मण जगताप यांनी 38 हजार 498 मतांनी अपक्ष आमदार राहुल कलाटेंचा पराभव केला होता

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती