गुगल मॅपवरुन रस्ता शोधणे खूप सामान्य सवय असली तरी असे करणे एका तरुणीच्या जीवावर बेतले आहे. सिंहगडावर दुचाकीवरुन फिरायला गेलेल्या तरुण आणि तरुणीने परतत येताना रस्ता शोधण्यासाठी गुगल मॅपची मदत घेतली मात्र मॅपवर चुकीचा मार्ग दाखवल्याने ते महामार्गावर आले. काही वेळातच रस्ता चुकल्याचे लक्षात आल्यावर वळण घेत असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकची धडक बसली. या अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
23 वर्षीय रिदा आणि 30 वर्षीय नटराज हे खराडी भागातील एका आयटी कंपनीत इंजीनियर म्हणून कार्यरत आहेत. ते दोघे सिंहगडावर फिरण्यासाठी गेले असताना वानवडीला जायचे असल्याने ते गुगल मॅपवर रस्ता शोधत होते अशात ते मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर आले. नंतर त्यांना रस्ता चुकल्याचे लक्षात आले. तेव्हा नवीन कात्रज बोगद्याजवळून वळण घेताना भरधाव वेगात येत असलेल्या ट्रकची धडक बसल्याने हा अपघात झाला. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे.