पिंपरी-चिंचवड मनपात लिपिक व इतर पदांच्या भरतीसाठी रविवारी (२८ मे) घेतलेल्या परीक्षेचा पेपर नाशिकच्या केंद्रावर फुटला. बटण कॅमेरा व ब्ल्यूटूथ या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा गैरप्रकार केल्याचा संशय आहे. त्यावरून मूळ उमेदवार, त्यांच्या जागी परीक्षा देणारा डमी परीक्षार्थी व उत्तरे पुरवणाऱ्या तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हे तिघेही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे परीक्षा अधिकारी नाना मोरे (रा. भोसरी, पुणे) यांनी याबाबत तक्रार दिली. नाशिक राेड येथील अार्टिलरी सेंटर भागातील फ्यूचर टेक सोल्युशन केंद्रावर परीक्षा घेतली जात होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खाेडेगावचा रहिवासी अर्जुन हरिसिंग मेहर हा परीक्षार्थी होता. मात्र, त्याच्या जागेवर राहुल मोहन नागलोध हा डमी उमेदवारी परीक्षा देण्यासाठी आला होता. त्याने बटण कॅमेरा व ब्ल्यूटूथच्या साहाय्याने प्रश्नपत्रिकेचा फाेटाे काढून बाहेर पाठवला. केंद्राबाहेर उभ्या अर्जुन रामधन राजपूत याने प्रश्नांची माहिती त्याला कळवली. राहुलच्या संशयास्पद हालचालींवरून पर्यवेक्षकाला संशय आल्यामुळे या प्रकरणाचा भंडाफोड झाला.