पुणे : सीडीएस-एनडीएसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

बुधवार, 24 मे 2023 (08:25 IST)
पुणे :केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) वतीने संयुक्त संरक्षण सेवा (सीडीएस) आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) व नेव्हल ऍकॅडमी (एनए) येथे प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 जून आहे.
 
या प्रवेश प्रक्रियेंतर्गत मुला-मुलींना अर्ज करता येणार आहे. दोन्ही प्रवेश प्रक्रियांसाठी पात्रता वेगवेगळय़ा असून, सीडीएससाठी शैक्षणिक पात्रता पदवी, तर एनडीए व एनएसाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रतेबरोबर वयोमर्यादादेखील ठेवण्यात आली आहे. यामध्ये लेखी परीक्षा आणि त्यानंतर सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखती (एसएसबी) अशा टप्प्यात ही प्रक्रिया पूर्ण होत उमेदवारांची निवड पुढील प्रशिक्षणासाठी केली जाईल.
 
सीडीएसच्या माध्यमातून इंडियन मिलिटरी ऍकॅडमी (आयएमए), ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकॅडमी (ओटीए), नेव्हल ऍकॅडमी आणि एअरफोर्स ऍकॅडमीसाठी उमेदवारांना प्रवेश दिला जाईल. यासाठी एकूण 349 जागा ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान एनडीए आणि नेव्हल ऍकॅडमीसाठी एकूण 395 जागा राखीव असून, त्यामध्ये मुलींसाठी 35 जागा ठेवण्यात आल्या आहेत.
 
दोन्ही प्रवेश प्रक्रियांसाठी घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षा 3 सप्टेंबर रोजी नियोजित करण्यात आल्या आहेत. यासाठी देशातील विविध केंद्रांवर या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना एसएसबीसाठी जाता येणार आहे. त्यातून निवड झालेल्या उमेदवारांना पुढे संबंधित प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येईल.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती