हिंमत असेल तर राजीनामा देऊन मैदानात या, अमित शाहांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

सोमवार, 20 डिसेंबर 2021 (08:16 IST)
पुणे ही लोकमान्य टिळकांची नगरी आहे. लोकमान्यांनी स्वराज्य माझा जन्म सिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना केली होती. मात्र, शिवसेना सत्ता हा माझा अधिकार आहे आणि कोणत्याही प्रकारे मिळवणार असं म्हणत आहे, अशी टीका करतानाच हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि मैदानात या. आम्ही तुमच्याशी दोन हात करायला तयार आहोत, असं खुलं आव्हानच भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं.
 
अमित शाह पुण्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी थेट ठाकरे सरकारवरच हल्ला करत पुणे महापालिका निवडणुकीत भाजपला विजयी करण्याचं आवाहन केलं. ही लोकमान्य टिळकांची नगरी आहे. टिळकांनी सांगितलं स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध अधिकार आहे. तो मी मिळवणारच. तर शिवसेना म्हणते सत्ता हा माझा अधिकार आहे. तो कोणत्याही प्रकारे मी मिळवणारच. बनले मुख्यमंत्री. हिंमत असेल तर राजीनामा द्या. तिघांनी एकत्र येऊन आमच्यासोबत लढा. आमच्याशी दोन हात करा. भाजप कार्यकर्ते तयार आहेत. महाराष्ट्राची जनताही हिशोब करायला बसली आहे, असा हल्ला शाह यांनी चढवला.
 
राज्यातील आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांचं ऑटोरिक्षावालं सरकार आहे. या सरकारचे तिन्ही चाकं पंक्चर झालेले आहेत. ते चालत नाही. फक्त धूर सोडतं आणि प्रदूषण करतं, अशी टीका करतानाच महाराष्ट्रातील जनतेच्या घराघरात जा. हे सरकार महाराष्ट्राचं कल्याण करू शकते का? असा सवाल करा. देशाचं नेतृत्व या महाराष्ट्राने केलं. सर्व गोष्टीत महाराष्ट्र आघाडीवर होता. कृषीपासून ते सर्व क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर होता. हे लोक महाराष्ट्राला गतवैभव मिळवून देऊ शकते का? हे निकम्म सरकार आहे. या सरकारच्या पतनाची सुरुवात पुणे महापालिकेच्या निकालाने झाली पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती