सोमय्यांमध्ये हिंमत असेल तर मुंबै बँकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढावा : राजू शेट्टी

शनिवार, 25 सप्टेंबर 2021 (08:02 IST)
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभाराच्या चौकशीचे आदेश राज्याच्या सहकार खात्याने दिले आहेत.यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून,आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून,किरीट सोमय्या यांच्यात हिंमत असेल, तर मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढावा,असे आव्हान दिले आहे.
 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी पत्रकारांना त्यांनी सांगितले की,आम्ही साखर कारखान्यांचा गैरव्यवहार बाहेर काढताना प्रांत, पक्ष असा भेदभाव कधीच केला नाही. देशातील सर्व राज्यातील साखर कारखान्यांचा गैरव्यवहार बाहेर काढला.सोमय्या मात्र विशिष्ट पक्षाच्या राजकीय नेत्यांच्या मागे लागले आहेत.विशिष्ट नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. शेतकऱ्यांचा वापर राजकारणासाठी करत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भ्रष्टाचार बाहेर काढावा, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
 
महापूर येऊन दोन महिने उलटले.अजूनही शेतकरी आणि पूरग्रस्त नागरिकांना सरकारची मदत मिळाली नाही. लवकरात लवकर ही मदत मिळावी अशी अपेक्षा आहे. तसे न झाल्यास जनतेच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला.
 
आता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त नागरिकांची थांबण्याची मानसिकता राहिलेली नाही. त्यामुळे देणार की नाही, तसेच देणार असाल तर कधी देणार,किती देणार हे जाहीर करा,अशी मागणी राजू शेट्टी यांनी यावेळी केली. याशिवाय आठ दिवसांत मदत न मिळाल्यास मंत्र्यांना भागात फिरणे मुश्कील करू,त्यांच्या गाड्या अडवू,असा इशाराही राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती