चार दिवसांपूर्वी नाशिक शहराजवळील शिंदे गावात एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकून मुंबई पोलिसांनी ड्रग्जचा कारखाना उध्वस्त केला होता. त्यानंतर नाशिक पोलिसांनी धाड टाकली असता कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला होता. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी जवळपास 5 कोटी रुपयांची 4 किलो 780 ग्रॅम एमडी ड्रग्स पावडर आणि कच्चा माल हस्तगत केला होता. या कारवाईमुळे नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात एकच खळबळ उडाली होती.
त्यानंतर येथील कारखाना चालविणारा भूषण पाटील हा फरार झाला होता. यानंतर पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विविध पथके रवाना केली होती. तर भूषण पाटील याचा भाऊ ललित पाटील हा पुण्यातील ससून रुग्णालयाच्या परिसरात ड्रग्ज सापडल्याने पळून गेला होता. त्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता.
अखेर पोलिसांच्या या शोध मोहिमेला यश आले असून नाशिकमधून फरार झालेला भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे याला पुणे पोलिसांनी मोठ्या शिताफीने उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता ललित पाटीलही लवकरच पोलिसांच्या हाती लागू शकतो.
दरम्यान, ललित पाटील आणि भूषण पाटील हे दोघे भाऊ ड्रग्जच्या व्यवसायात गुंतलेले असून भूषण याचा नाशिक येथील शिंदे गावात ड्रग्ज बनवण्याचा कारखाना आहे. या कारखान्यावर मुंबई आणि नाशिक पोलिसांकडून छापेमारी करण्यात आली. यामध्ये कोट्यावधी रुपयांचा ड्रग्जचा साठा आढळून आला होता.