पुणे शहरात आतापर्यंत तब्बल दहा लाख लसींचे डोस; अडीच लाख जणांचे दोन्ही डोस पूर्ण

सोमवार, 31 मे 2021 (16:58 IST)
18 वर्षांवरील 35 हजार जणांचे लसीकरण
पुणे शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा पार झाला आहे. शहरात कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत 16 मार्च पासून 27 मेपर्यंत 9 लाख 95 हजार 357 लसींचे डोस देण्यात आले आहेत. त्यात, 2 लाख 54 हजार 693 जणांचे दोन्ही डोस पुर्ण झाले असून 7 लाख 40 हजार 682 जणांचा पहिला डोस दिला आहे. दरम्यान, पहिला डोस घेतलेल्यांमध्ये 35 हजार नागरिक 18 ते 44 वयोगटातील असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
 
शहरात 16 मार्चपासून कोरोनाचे प्रतिबंधीत लसीकरण सुरू झाले. यामध्ये सर्वप्रथम शासकीय आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर 1 फेब्रुवारी पासून फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण सुरु झाले तर 1 मार्च रोजी 65 वर्षांवरील नागरिकांचे त्यानंतर 1 एप्रील पासून 45 वर्षांपुढील नागरिकांचे आणि 1 मे पासून 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले.
 
या लसीकरण कालावधीत शहरात आता पर्यंत 9 लाख 95 हजार लसींचे डोस देण्यात आले आहेत. तर आता लसींच्या उपलब्धतेनुसार 45 वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण सुरू असून 22 जून पासून खासगी रूग्णालयातही लसीकरण सुरू झाले आहे. त्या ठिकाणी 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे, शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये टप्प्याटप्प्याने लस उपलब्ध होत असली तरी खासगी हॉस्पीटलमुळे लसीकरणाला गती मिळत आहे. शहरात करोना लसीकरणाची एकूण 217 केंद्र असून त्यात, 130 शासकीय, 76 खासगी केंद्र आहेत.
 
दरम्यान, 1 मे पासून देशात 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, शासकीय केंद्रावर सुरूवातीचे तीन ते चार दिवसच ही लस उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर आता या वयोगटासाठी खासगी रूग्णालयात लस मिळत असून आता पर्यंत या वयोगटातील 35 हजार 744 जणांचा पहिला डोस पुर्ण झाला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती