‘सीरम’मध्ये कोव्होव्हॅक्सची प्रायोगिक निर्मिती सुरु

गुरूवार, 3 जून 2021 (09:04 IST)
पुण्याच्या सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या कंपनीने जोखीम घेत कोव्होव्हॅक्स या नवीन लशीचे उत्पादन चाचणी स्तरावर सुरू केले आहे. या लशीला आपत्कालीन मान्यता मिळण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. ही लस प्रथिनांवर आधारित आहे. पुण्याची सीरम इन्स्टिटय़ूट कोव्होव्हॅक्स लस तयार करण्यासाठी प्रयत्न करीत असून ही लस नोव्होव्हॅक्सची आवृती आहे. अमेरिकेने संरक्षण उत्पादन कायदा लागू करून लशीला लागणारे घटक निर्यात करण्यावर निर्बंध लागू केल्याने या लशीची निर्मिती शक्य झालेली नव्हती. आता कंपनीत कोव्होव्हॅक्सचे चाचणी उत्पादन अगदी कमी प्रमाणात सुरू झाले असून काही प्रमाणात कच्चे घटकही मिळाले आहेत. अमेरिकेकडून आणखी लस घटक मिळण्याची शक्यता आहे. त्यावर लशीचे भवितव्य अवलंबून आहे.
 
अमेरिकी सरकारशी याबाबत चर्चा सुरू आहे, असे या घडामोडींशी परिचित व्यक्तींचे म्हणणे आहे. कोव्होव्हॅक्स ही नोव्होव्हॅक्स लशीची प्रगत आवृत्ती असून त्याला अजून देशात मान्यता मिळालेली नाही. नोव्होव्हॅक्सने त्यांच्या लशीच्या चाचण्या युरोप, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशांत घेण्याचे ठरवले असून जुलै ते सप्टेंबरदरम्यान या लशीच्या आपत्कालीन परवान्यासाठी अर्ज केला जाण्याची शक्यता आहे. सीरमनेही कोव्होव्हॅक्सच्या परवान्यासाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेस गती देण्याचे ठरवले असून नोव्होव्हॅक्सला ब्रिटन व युरोपात मान्यता मिळाली तर ती प्रक्रिया भारत सरकारच्या सुधारित निकषानुसार आपल्या देशात करावी लागणार आहे. नोव्होव्हॅक्सच्या चाचण्या ब्रिटनमध्ये यशस्वी झाल्या असून त्यात सार्स सीओव्ही २ विषाणूविरोधात ९६.४ टक्के परिणामकारकता दिसून आली आहे. बी.१.१.७ विषाणूविरोधात त्याची परिणामकारकता ८६.३ टक्के आहे. हा विषाणू प्रथमच ब्रिटनमध्ये सापडला होता. लशीची क्षमता दक्षिण आफ्रिकेतील चाचण्यात बी. १.३५१ विषाणूविरोधात ५५.४ टक्के दिसून आली आहे. प्रथिन घटकांवर आधारित असलेली ही लस तज्ज्ञांच्या मते सुधारित मानली जाते. नोव्होव्हॅक्स या लशीसाठी जपान, दक्षिण कोरिया या देशांनी आगाऊ खरेदी करार केले असून गावी प्रकल्पात १.१ अब्ज मात्रा मागवण्यात आल्या असून जुलै सप्टेंबर दरम्यान लस मिळणे सुरू होईल. सीरम इन्स्टिटय़ूट ७५ कोटी कोव्होव्हॅक्स लशी तयार करणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती