पुण्यात पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग १ फेब्रुवारीपासून सुरू

शनिवार, 23 जानेवारी 2021 (07:54 IST)
पुणे शहरातील पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुणे महापालिका अतिरिक्त आय़ुक्त रुबल अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. याआधी २४ डिसेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती. महापालिकेकडून यासंबंधी अधिकृत पत्रक काढण्यात आले आहेत. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मार्गदर्शक सूचना आणि अटींचं पालन करत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान यावेळी मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं आवश्यक असणार आहे.
 
शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोव्हिड १९ साठीची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असून चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनाने परिमंडळ वैद्यकीय अधिकारी आणि क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांना सादर करणं आवश्यक असणार आहे.
 
याशिवाय वर्गात तसंच स्टाफरुममधील बैठकव्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमानुसार ठेवावी लागणार आहे. वर्गात एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावासहित बैठक व्यवस्था करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी सहमती शाळा प्रमुखांनी प्राप्त करुन पर्यवेक्षक प्राथमिक शिक्षण विभागाला सादर करणं बंधनकारक आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती