आयकर विभागाच्या छाप्यासंदर्भात विचारताच उपमुख्यमंत्र्यांना म्हणाले, “मी हात जोडले आणि…”

शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (08:42 IST)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून गुरुवारी छापे टाकण्यात आले. तसेच साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. केवळ माझे नातेवाईक आहेत, म्हणून त्यांच्या संस्थांवर छापे टाकले असतील, तर कोणत्या स्तरावर जाऊन राजकारण केले जात आहे, वेगवेगळ्या संस्थांचा कसा वापर केला जात आहे, याचा आता जनतेनेच विचार करावा, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिली होती. त्यानंतर आता पुन्हा पवारांनी छापेमारीसंदर्भात भाष्य केलं आहे.
 
पुण्यातल्या करोना आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. यावेळी आपल्या निकटवर्तीयांवर झालेल्या आयकर विभागाच्या छापेमारीबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले, सध्या चौकशी चालू आहे. ते त्यांचं काम करत आहेत. त्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर ते जेव्हा जातील, त्यानंतर मी यासंदर्भात माझी भूमिका काय आहे ती मांडेन. कारण तिथे त्यांचं काम सुरू आहे. त्यांचा मुक्कामही त्याच ठिकाणी आहे. इनकम टॅक्स विभागाचा कोणत्याही कंपनीवर छापा टाकण्याचा अधिकार आहे. त्यांना तो नियमाने दिलेला आहे. त्यांनी त्यांचं काम करावं. ते गेले की मी बोलेन. मला काहीही बोलून त्यांच्या कामात व्यत्यय आणायचा नाही. पाहुणे लोक तिथे थांबले आहेत. ते त्यांचं काम करून गेल्यानंतर मी बोलणार आहे. मी कुठे पळून जाणार नाही. मी नियमित टॅक्स भरतो,मी आर्थिक शिस्त पाळतो आणि पाळायला लावतो.
 
पुण्यातल्या विधान भवन परिसरात अजित पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्याविषयीही पवारांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मला त्या कार्यकर्त्यांना समजावून सांगायचं आहे की, कायदा कायद्याच्या पद्धतीने काम करत असतो, संस्था संस्थांच्या पद्धतीने कामं करत असतात आणि आपण सगळे जबाबदार नागरिक आहोत. नागरिक या नात्याने आपण आपलं काम करायचं असतं, असं मी प्रमुखांना सांगितलं की आता ह्या सगळ्यांना जाऊद्या. त्यानंतर मी त्यांना हात जोडले आणि जायला सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती