ज्ञानेश्वर किसन पवार (वय 42, रा. वैदुवाडी, हडपसर) आणि ओंकार संदिप तिवारी (वय 23, रा. शिवनेरी नगर, लेन नं. 24, कोंढवा खुर्द ) असे कोठडी सुनावलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात ओमप्रकाश बुधाई गुप्ता (वय 34, रा. धायरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅम्प परिसरात फेब्रुवारी 2019 ते ऑगस्ट 2021 या कालावधीत हा प्रकार घडला.
आरोपींनी साडेतीन लाखांची खंडणी मागितली आणि तडजोडीअंती अडीच लाख रूपये घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आरोपींनी वारंवार कॉल करून धमकी दिली असून त्याचे फिर्यादींनी ध्वनीमुद्रण केले आहे. त्यामुळे आरोपींच्या आवाजाचे नमुने घ्यायचे आहेत. फिर्यादींकडून घेतलेली अतिरिक्त रक्कम तसेच कागदपत्रे जप्त करणे, आरोपींनी याप्रकारचे आणखी गुन्हे केले असल्याची शक्यता असून त्या द़ृष्टिने तपास करायचा असल्याने त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. ती न्यायालयाने मान्य केली.
चार लाख 45 हजार रूपये केले परत :
फिर्यादी ओमप्रकाश याने पवार आणि तिवारी याच्याकडून 1 लाख 95 हजार रूपये व्याजाने घेतले होते.त्यानंतर मुद्दल आणि त्यावरील व्याज असे 4 लाख 45 हजार रूपये परत केले होते. मात्र, त्यानंतरही आरोपी पवारने फिर्यादीस शिवीगाळ केली.तसेच सदनिका नावावर करून घेण्याची धमकी देत अडीच लाखांची खंडणी घेतली.त्यानंतरही आरोपींनी एप्रिल 2021 मध्ये फिर्यादीच्या सदनिकेत जबरदस्तीने प्रवेश केला आणि शिवीगाळ करीत दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे आणि त्यांच्या पथकाने आरोपींना अटक केली आहे.