पुण्यात सर्व ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, संग्रहालये खुली

बुधवार, 6 जानेवारी 2021 (08:26 IST)
पुणे जिल्हयातील सर्व ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, संग्रहालये कोविड-19 संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन खुली करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले. बुधवारपासून ही ठिकाणं सुरू होणार आहेत. 
 
जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19 विषाणु हा जागतिक साथीचा रोग घोषित केला असून, करोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम २०२० प्रसिद्ध केलेले आहेत. त्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील प्राप्त अधिकारानुसार जिल्हयातील सर्व ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, संग्रहालये कोविड-19 संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन खुले करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
 
या ठिकाणी मानक कार्यप्रणालीचा अवंलब करणे बंधनकारक असणार आहे. आवश्यक शारिरिक अंतर बाळगणे, मास्कचा वापर करणे, वेळोवेळी हात स्वच्छ करणे बंधनकारक असणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग नियंत्रण कायदा १८९७ अन्वये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती