पुण्यात आढळला लांडगा आणि कुत्र्याचा संकरित प्राणी, ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे का?
मंगळवार, 18 जून 2024 (09:42 IST)
सिद्धेश ब्राह्मणकर पुण्याजवळच्या माळरानावर गेले होते, तेव्हा त्यांना एक प्राणी दिसला जो थोडा वेगळाच होता.
“आम्ही असंच भटकत होतो आणि योगायोगानंच तो आम्हाला दिसला. तो लांडग्यासारखा दिसत होता, पण लांडगाच आहे की नाही असं खात्रीनं सांगता येत नव्हतं. तो नेहमीसारख्या करड्या-राखाडी रंगाचा नाही तर पिवळसर रंगाचा होता. ही गोष्ट 2014 सालची आहे.”
तेव्हा सिद्धेश पुण्याच्या द ग्रासलँड्स ट्रस्ट या नागरिकांनीच स्थापन केलेल्या संस्थेतल्या आपल्या सहकाऱ्यांसोबत त्या परिसरात फिरत होते. पुढे आसपास राहणाऱ्या लोकांकडून त्या भागात असा वेगळ्या रंगाचा प्राणी दिसल्याची माहिती मिळाली, तेव्हा या सगळ्यांनी आणखी तपास करायचं ठरवलं.
या ट्रस्टचे संस्थापक मिहीर गोडबोले सांगतात, “लॉकडाऊनच्या दिवसांत आम्हाला पुण्याच्या जवळच आणखी एक तसाच पिवळसर प्राणी दिसला. नंतर एक मादीही दिसली, जी दिसत तर लांडग्यासारखी होती, पण तिच्या त्वचेवर पट्टे होते.”
शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन आणि वनविभागाची परवानगी घेऊन त्यांनी मग या प्राण्याचे केस आणि विष्ठा गोळा केली. अर्थातच हे काम सोपं तर नव्हतंच.
मिहीर सांगतात, “लांडगा हा उमदा आणि तेवढाच गूढ प्राणी आहे. त्याचा माग काढणं खूप कठीण असतं. लांडगे मानवी वस्तीच्या जवळपास राहतात आणि एक प्रकारे ते माणसाला चांगलंच ओळखून असतात. त्यामुळे आम्हाला ते सहज हुलकावणी देऊन पसार व्हायचे. पण आम्ही अनेक दिवस लक्ष ठेवून होतो.
“ते कुठे वावरतात, त्यांच्या बसण्याच्या जागा कुठे आहेत आणि त्या जागा सोडून ते कधी जातात यावर आम्ही नजर ठेवली. त्यामुळेच आम्हाला या विचित्र रंगाच्या प्राण्याचे केस आणि विष्ठा मिळवता आली.”
जिनोम सिक्वेन्सिंग केल्यावर त्यांची शंका खरी ठरली. हा प्राणी म्हणजे कुत्रा आणि लांडग्याच्या संकरातून तयार झालेला हायब्रिड प्राणी होता.
अशा प्राण्यांना वूल्फ-डॉग म्हटलं जातं. इथे हे लक्षात घ्यायला हवं की हा संकरित प्राणी पाळीव कुत्र्यांच्या वूल्फडॉग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रजातींपेक्षा वेगळा असतो.
कुत्रा आणि लांडगा यांच्यातील संकराच्या अशा घटनांवर जगभरात संशोधन होत आलं आहे. पण भारतात असा ठोस पुरावा मिळण्याची आणि त्याचा वैज्ञानिक अभ्यास केला जाण्याची ही पहिलीच वेळ होती.
या संशोधनानं आणखी एक गोष्ट सिद्ध केली – हा संकरित प्राणी नव्या पिल्लांना जन्म देऊ शकतो.
द ग्रासलँड्स ट्रस्टसोबतच अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी अँड एन्वहार्यन्मेंट (ATREE) आणि नॅशनल सेंटर फॉर बायॉलॉजिकल सायन्सेस (NCBS) या तीन संस्थांनी एकत्र येऊन हे संशोधन केलं होतं, जे जर्नल ऑफ इकॉलॉजी अँड इव्होल्यूशनमध्ये प्रकाशित झालं.
वर्षभरानंतरही लांडग्यांच्या संवर्धनासाठीच्या प्रयत्नांमध्ये फार मोठे बदल झालेले नाहीत.
लांडगा आणि कुत्र्यांमध्ये हा संकर का घडून येतो आहे? भटक्या कुत्र्यांची वाढलेली संख्या त्यासाठी कारणीभूत आहे का आणि यावर आणखी संशोधन करणं का गरजेचं आहे, याचाच हा आढावा.
माळरानांचे राजे
ग्रे वूल्फ किंवा करड्या रंगाचे लांडगे जगभरात वेगवेगळ्या प्रकारच्या अधिवासांत राहतात – मग ते माळरानं असोत वा जंगल, बर्फाळ प्रदेश किंवा अगदी वाळवंट.
पण भारतातले करडे लांडगे प्रामुख्यानं मानवी वस्तीलगतच्या सव्हाना माळरानांवर राहतात.
आता सव्हाना म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर आफ्रिकेतला केनियासारख्या देशातला विस्तीर्ण गवताळ प्रदेश येतो. पण भारतातही हिमालयालगत तराई प्रदेशात, राजस्थानमध्ये आणि महाराष्ट्रात (पुणे-सासवड, अहमदनगर, सोलापूर) परिसरात अशी गवताळ माळरानं आहेत.
“भारतीय सव्हाना ही एक वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्था आहे. त्यात अनेक प्राणी राहतात- काळवीट, साळींदर, माळढोक पक्षी. लांडगे या परिसंस्थेतील अन्नासाखळीचा सर्वांत वरचा आणि महत्त्वाचा भाग आहेत,” असं मिहीर स्पष्ट करतात.
भारतात लांडग्यांच्या दोन प्रजाती आहेत. हिमालयीन लांडगे आणि इंडियन ग्रे वूल्फ म्हणजे भारतीय लांडगा (Canis lupus pallipes).
भारतीय लांडगा हा विशेष महत्त्वाचा आहे कारण भारतातली ही करड्या लांडग्यांची प्रजाती जगभरातल्या करड्या लांडग्यांमध्ये सर्वात प्राचीन प्रजातींपैकी एक आहे. म्हणजे एक प्रकारे ते जगभरातल्या करड्या लांडग्यांचे पूर्वज आहेत आणि ते नष्ट झाले तर उत्क्रांतीतली एक महत्त्वाची साखळी नष्ट होईल.
IUCN या संस्थेच्या वर्गवारीनुसार करडा लांडगा ही जगभरात तशी चिंताजनक स्थिती असलेली प्रजाती नाही, पण भारतासारख्या काही देशांमध्ये त्यांच्यावर संकट आहे. त्यात भारताचा समावेश आहे.
भारतात 1972 सालच्या वन्यजीव कायद्यानुसार लांडग्यांना संरक्षण दिलं आहे. पण लांडग्यांच्या अधिवासातील वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे हे प्राणी संकटात आहेत असं संशोधक सांगतात.
भारतात लांडग्यांची संख्या 2,000 ते 3,000 च्या आसपास आहे, असा अंदाज आहे. पण हे आकडे खरे नाहीत असं संशोधक सांगतात कारण हा केवळ अंदाज आहे आणि वाघांची जशी शिरगणती होते, तशी लांडग्यांची झालेली नाही.
महाराष्ट्रातल्या सव्हाना माळरानांवर लांडग्यांच्या संख्येची घनता जास्त आहे आणि पुणे जिल्ह्यातच 30 हून अधिक लांडगे आहेत अशा अंदाज आहेत. याच पुण्याच्या माळरानांवर संशोधकांना तो लांडगा-कुत्रा हायब्रिड प्राणी सापडला होता.
संशोधनातून काय दिसून आलं?
ATREE या संस्थेत जैवविविधेतवर संशोधन करणारे अबि वनक सांगतात, “कुत्रा आणि लांडगा हे प्राणी जेनेटिक्सचा विचार करता अगदी जवळचे नातेवाईक आहेत. लांडग्यांपासून कुत्र्यांची उत्क्रांती झाली – एक प्रकारे कुत्रा म्हणजे पाळीव लांडगाच आहे.”
ते पुढे माहिती देतात, “जगभरात लांडगा-कुत्रा संकर झाल्याच्या अनेक घटना आहेत. भारतातही काही फोटोग्राफिक पुरावे आहेत. हे का होतं, तर एखाद्या ठिकाणी लांडग्यांची संख्या कमी झाली तर त्यांना नवा जोडीदार मिळू शकत नाही. अशा वेळी ते कुत्र्यांसोबत संकर करतात.”
अलीकडच्या काळात माळरानांवर मानवी हस्तक्षेपात वाढ झाली आहे. शेती, गुरे चारणं, कचरा फेकणं, अशा गोष्टींमुळे माळरानं संकटात आहेत. शहरीकरण वाढलं, वस्ती वाढली की त्यासोबत भटके कुत्रेही येतात आणि जंगली लांडग्यांसोबत त्यांचा संपर्क वाढतो.
याआधी माणसानं कुत्रा आणि लांडगा यांच्यात संकर घडवून आणून कुत्र्यांच्या काही प्रजाती विकसित करण्याच्या घटना घडल्या आहेत आणि अशा ब्रीडिंगवर अनेक ठिकाणी कायद्यानं बंदी आहे.
पण जंगलात असा संकर घडून येणं जास्त घातक ठरू शकतं, कारण त्यामुळे लांडग्यांची प्रजाती संकटात सापडू शकते. त्यांची वेगळी जनुकीय ओळखच मिटून जाऊ शकते.
उमा रामकृष्णन त्याविषयी अधिक समजावून सांगतात. त्या NCBS या संस्थेत मोलेक्युलर इकॉलॉजिस्ट आणि प्राध्यापक आहेत. उमा यांच्याच प्रयोगशाळेनं लांडगा-कुत्रा हायब्रिड प्राण्याचं जिनोम सिक्वेंसिंग केलं होतं आणि भारतात अशा हायब्रीड प्राण्याचं अस्तित्व सिद्ध केलं होतं.
उमा सांगतात, “समजा रंगांचे दोन डबे घेतले आणि ते दोन्ही एकत्र करायला लागलो, तर अखेर ते रंग मुळात जसे होते तसे राहात नाहीत. त्याच प्रकारे संकरामुळे एखाद्या प्रजातीचा जीन पूल (जनुकीय वैशिष्ट्ये) पुसट होत जातो.
“यात एखाद्या प्रजातीत प्राण्यांची संख्या जास्त असेल – जसं इथे कुत्र्यांच्या बाबतीत झालं आहे, आणि दुसऱ्या प्रजातीचे प्राणी – जसं की लांडगे - कमी असतील तर कुत्र्यांमुळे लांडग्यांची जनुकीय वैशिष्ठ्ये पुसली जाऊन अखेर लांडग्यांची प्रजातीच नष्ट होऊ शकते.”
अबी वनक अधिक माहिती देतात, “कुत्रा आणि लांडगा, यांच्यात जनुकीय दृष्ट्या फरक आहे. माणसाळवले जाताना म्हणजे पाळीव बनताना कुत्र्यांनी मूळच्या लांडग्यासारख्या काही गोष्टी सोडून दिल्या आहेत. म्हणजे ते आकाराने लहान झाले, त्यांची ताकद कमी झाली. संकर झाला तर यातल्या काही गोष्टी लांडग्यांमध्ये उतरू शकतात, ज्यामुळे लांडगे संकटात सापडू शकतात.”
पण केवळ असा संकर हे एकच संकट नाही.
मिहीर गोडबोले सांगतात, “कुत्र्यांमुळे रेबिजसारखे आजार आणि व्हायरसची लागण लांडग्यांना होऊ शकते. यातले काही विषाणू इतके घातक असतात की त्यांचा संसर्ग झाल्यानं एखाद्या भागात राहणारे सर्व जंगली लांडगे मरून जाऊ शकतात. भटके कुत्रे छोट्या प्राण्यांना मारतात ज्यांच्यावर एरवी लांडग्यांचं पोट भरतं.”
अर्थात फक्त कुत्र्यांमुळेच लांडगे संकटात आहेत असंही नाही. लांडग्यांच्या अधिवासात बिबट्यांची वर्दळ वाढल्यानं या माळरानांवरचा ताळमेळ बिघडत असल्याचं मिहीर यांच्या ग्रासलँड्स ट्रस्टच्या टीमनंच केलेल्या आणखी एका अभ्यासात स्पष्ट झालं आहे
पण अजूनही भारतीय लांडग्यांच्या संरक्षण किंवा संवर्धनासाठी पुरेसे प्रयत्न होत नाहीयेत, याकडे संशोधक लक्ष वेधून घेतात.
लांडग्यांचं रक्षण आणि माळरानांचं संरक्षण
अबी वनक सांगतात, “वाघांचं संवर्धन केलं जातं, तसा लांडग्यांचा विचार करून चालणार नाही. आपण लांडग्यांसाठी संरक्षित अभयारण्यं तयार करू शकत नाही. त्यांचा अधिवास असलेल्या प्रदेशातील जमिनीचा मिश्र वापर होतो. ते अनेकदा पाळीव प्राण्यांची शिकार करून पोट भरतात. त्यामुळे या माळरानांवरचे बाकीचे घटक, मेंढपाळ आणि गावकऱ्यांचा विचारही व्हायला हवा.”
द ग्रासलँड्स ट्रस्ट आता एक प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवत आहे. त्यात गावकरी आणि इतर सर्व घटकांना सामावून घेतलं आहे आणि ते या गवताळ प्रदेशाचं संवर्धन आणि जंगली प्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करत आहे.
त्यांनी राज्यात लांडग्यांच्या संवर्धनासाठी वनविभागाला एक योजना सुचवली आहे आणि त्यावर अखेरच्या परवानग्या येणं बाकी आहे.
पण आजवरच्या संशोधनानं काही वेगळे प्रश्नही उभे केले आहेत याकडे उमा रामकृष्णन लक्ष वेधून घेतात.
“आपल्यासमोरचं एक महत्त्वाचं आव्हान म्हणजे या हायब्रिड प्राण्याची वर्गवारी कशी करायची? त्याला वन्यजीव कायद्याअंतर्गत संरक्षण आहे का? असे प्राणी आढळले तर त्यांचं काय करायचं? हा केवळ नैतिकतेचा प्रश्न नाही तर पर्यावरणशास्त्र आणि जीवशास्त्रासमोरचा प्रश्नही आहे.”
त्या सांगतात की एखाद्या विशिष्ट भागात विशिष्ट प्राण्यांच्या जनुकीय जडणघडणीत झालेले बदल हे त्या विशिष्ट प्रजातीच्या बाबतीत नेमकं काय होत आहे किंवा काय होऊ घातलं आहे, याची माहिती देत असतात आणि त्याआधारे संशोधक सरकार आणि संवर्धन करणाऱ्यांना सल्ला देत असतात.
“आपण जेव्हा उत्क्रांतीचा विचार करतो, तेव्हा आपण भूतकाळात काय झालं याचा विचार करतो. पण उत्क्रांती भविष्यातही होणार आहे. प्रजातींची ही उत्क्रांती कशी होईल याची दिशा आपण, म्हणजे माणूस ठरवणार आहे का?”