नागपुरात पारा 56 अंशावर पोहोचल्याची नोंद हवामान विभागानंच चुकीची का ठरवली?

शनिवार, 1 जून 2024 (17:34 IST)
उष्णतेच्या लाटेमुळे भारतातले अनेक भाग अक्षरश: होरपळत आहेत. काही ठिकाणी 50 अंशाच्या वर तापमानाचा पारा नोंदवल्याचा दावा करण्यात आला.दिल्लीतल्या मुंगेशपूर स्वयंचलित हवामान केंद्रात 52.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचा दावा 29 मे 2024 रोजी करण्यात आला. मात्र, हे तापमान खरं नाही, असं भारतीय हवामान विभागानं स्पष्ट केलं.
 
दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्रातील नागपुरातल्या तापमानाबाबतही असाच दावा करण्यात आला.
नागपुरात 30 मे 2024 रोजी रामदासपेठमधील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मोकळ्या जागेत असलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रात 56 अंश सेल्सिअस तापमानाची नोंदीचा दावा करण्यात आला.
मात्र, हे तापमानही चुकीचं असल्याचं नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं स्पष्ट केलंय.
 
हवामान विभागाचं जे स्वयंचलित हवामान केंद्र (Automatic Weather Station AWS) तापमानाची नोंद करतं, ते तंत्रज्ञान कसं काम करतं?
 
भारतीय हवामान विभागानं हे तंत्रज्ञान का लागू केलं?
 
या प्रश्नांची उत्तरं आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी, दिल्ली आणि नागपुरात नेमकं काय घडलं, हे सविस्तर समजून घेऊया.
 
दिल्लीत खरंच पारा 52.3 अंशावर पोहोचला होता?
गेल्या आठ दिवसांपासून उष्णतेच्या लाटा सुरू आहेत. भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत सर्वाधिक तापमान नोंदवलं जातंय.
 
मात्र, दिल्लीतल्या मुंगेशपूर स्वयंचलित हवामान केंद्रानं दावा केला की, बुधवारी (29 मे) पहिल्यांदाच 50 अंश सेल्सिअसहून अधिक म्हणजेच 52.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. तसंच, हे तापमान शतकातील सर्वात जास्त तापमान आहे.
पण त्याच दिवशी भारतीय हवामान विभागानं एक पत्रक जारी करत म्हटलं की, काही त्रुटींमुळे मुंगेशपूर स्वयंचलित हवामान केंद्राने जास्त तापमान नोंदवल्याचं सांगितलं.
 
दिल्लीत शहराच्या विविध भागात कमाल तापमान 45.2 अंश सेल्सिअस ते 49.1 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवण्यात आलं. पण मुंगेशपूर स्वयंचलित हवामान केंद्रानं 52.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं.
 
हे या सेन्सरमधील त्रुटीमुळे किंवा स्थानिक घटकांमुळे असू शकते. या केंद्राची तपासणी सुरू आहे, असं हवामान विभागानं या पत्रकात म्हटलं आहे. सध्या या स्थानकाची तपासणी सुरू आहे.
 
नागपुरात तर पारा 56 अंशावर गेल्याचा दावा
या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरुवारी (30 मे) नागपुरातही स्वयंचलित हवामान केंद्रानं 56 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली आणि सर्वांना काळजीचा धक्का बसला.
 
नागपुरातील रामदास पेठमधील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 24 हेक्टर जागेवरील स्वयंचलित हवामान केंद्रानं ही नोंद केली. याबद्दल टाइम्स ऑफ इंडियानं वृत्त दिलं होतं.
 
बीबीसी मराठीनं सुद्धा स्वयंचलित हवामान केंद्राच्या वेबसाईटला सकाळच्या सुमारास भेट दिली, त्यावेळी देखील 52 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आढळून आली.
 
मात्र, हे तापमान चुकीचं असल्याचं नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून नंतर स्पष्ट करण्यात आलं.
 
हवामान विभागानं स्पष्टीकरणात म्हटलं की, "रामदासपेठ येथील स्वयंचलित हवामान केंद्राच्या सेन्सरमध्ये बिघाड झाला असल्याने चुकीचं तापमान नोंदवण्यात आलं. इतर स्वयंचलित हवामान केंद्र आणि हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार 44-45 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलंय."
 
तसंच, हे सेन्सर इलेक्ट्रॉनिक असल्यानं एका विशिष्ट तापमानाच्या वर गेल्यानंतर त्यामध्ये बिघाड होऊ शकतो, असंही हवामान विभागानं सांगितलंय.
 
यानंतर स्वयंचलित हवामान केंद्राच्या वेबसाईटवरून 50 अंशाच्या वर गेलेलं तापमान चुकीचं असल्यानं ते काढून टाकण्यात आलं.
 
स्वयंचलित हवामान केंद्र (AWS) कसं काम करतं?
पुणे वेधशाळेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, स्वयंचलित हवामान केंद्र (AWS) हे एक असं तंत्रज्ञान आहे जे स्वतः वातावरणाचं निरीक्षण नोंदवून ती माहिती पुणे इथं असलेल्या स्वयंचलित हवामान केंद्राला पुरवते. ही माहिती स्वयंचलित हवामान केंद्राच्या वेबसाईटवर अपडेट होत असते.
 
इलेक्ट्रॉनिक सेन्सरच्या मदतीनं हे यंत्र काम करत असते. जमिनीच्या पृष्ठभागावरील वातावरणाच्या निरीक्षणांची संख्या आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी स्वयंचलित हवामान केंद्र वापरली जातात.
 
हे स्वयंचलित हवामान केंद्राचं तंत्रज्ञान हवेचं तापमान, आद्रता, वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा ही सगळी निरीक्षणं तासाला नोंदवून ही माहिती स्वयंचलित हवामान केंद्राच्या वेबसाईटवर ट्रान्समिट करण्याचं काम करतेय.
 
स्वयंचलित हवामान केंद्राचा मोठा फायदा म्हणजे ते रिअल टाइम वातावरणाचं निरीक्षण नोंदवतं.
 
स्वयंचलित हवामान केंद्राची गरज का पडली?
भारतीय हवामान विभागाला या स्वयंचलित हवामान केंद्राची गरज का पडली?
 
भारतीय हवामान विभागाची स्थापना झाल्यापासून तापमान, आद्रता, वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, पावसाचा अंदाज, वादळ या सगळ्या वातावरणाचा अंदाज वर्तवला जातो. त्याची निरीक्षणं नोंदवली जातात. देशातील चक्रीवादळं, वेस्टर्न डिस्टर्बन्स, गडगडाटी वादळं, अवकाळी पाऊस, मान्सून या सगळ्या हवामान प्रणालीचे सतत निरीक्षण नोंदवण्यासाठी भारतीय वेधशाळांचं पारंपरिक नेटवर्क पुरेसं नाही.
 
त्यामुळे स्वयंचलित हवामान केंद्र (AWS)चे जाळं तयार करण्यात आलं जेणेकरून मानवी हस्तक्षेप कमी होईल आणि भारतीय हवामान विभागावरील ताण कमी होईल. कारण AWS पूर्णपणे स्वयंचलित यंत्रणा आहे.
 
पहिलं स्वयंचलित हवामान केंद्र कधी सुरू झालं?
हवामानाचं निरीक्षण नोंदवून त्याचं प्रसारण स्वयंचलितरित्या करणं ही गोष्ट जागतिक हवामान विभागासाठी नवीन नव्हती.
 
हवामान विभागात ऑटोमेशनची सुरुवात 1877 मध्ये झाली जेव्हा डच हवामानशास्त्रीय उपकरणं डिझाईन करणारे ऑलंड यांनी बाईज बॅलेट यांच्या सूचनेनुसार टेलिमेटिओग्राफ विकसित केला होता.
 
त्यानंतर यूएस नेव्हीने 1940 च्या दशकात पहिल्यांदा रेडिओ कम्युनिकेशनसह स्वयंचलित हवामान केंद्र (AWS) प्रायोजित केला आणि यूएस नॅशनल ब्युरो ऑफ स्टँडर्सने AWS विकसित केला. त्यानंतर यामध्ये तंत्रज्ञानानुसार आणखी सुधारणा होत गेल्या.
 
भारतीय हवामान विभागात हे ऑटोमेशन कधीपासून झालं?
भारतात स्वयंचलित हवामान केंद्राचा इतिहास 1974-75 सालात सापडतो जेव्हा आर्यभट्ट या पहिल्या उपग्रहाद्वारे हवामानविषयक माहिती पोहोचविण्याचा प्रयोग झाला होता. त्यानंतर भारतीय हवामान विभागानं 1979-80 साली ISRO सोबत मिळून भास्कर उपग्रहाद्वारे डेटा कलेक्शन प्लॅटफॉर्मचे नेटवर्क हाताळण्यासाठी एक प्रयोग केला होता.
 
उपग्रहाने प्रसारित केलेली माहिती श्रीहरीकोटा रॉकेट रेंज इथं असल्या अर्थ स्टेशनवर प्राप्त व्हायची. हेसुद्धा भारतीय हवामान विभागातलं ऑटोमेशनच्या दृष्टीनं टाकलेलं महत्वाचं पाऊल होतं. त्यानंतर आयएमडीनं भारतात जवळपास 100 डेटा कलेक्शन प्लॅटफॉर्म स्थापन केले.
 
पण सिस्टम डिझाइनच्या मर्यादेमुळे या नेटवर्कची गुणवत्ता ढासळली होती. त्यानंतर पुढे 1997 साली मायक्रोप्रोसेसरवर आधारित 15 अत्याधुनिक AWS चे नेटवर्क स्थापन करण्यात आलं. हे सगळं प्रायोगिक तत्वावर होतं. या AWS नेटवर्कचं संगणीकृत निरीक्षण नोंदवण्यासाठी आयएमडीनं काही अल्गोरिदम तयार केले.
 
1998 ते 2005 या कालावधीत चाचणी आणि मूल्यमापन केल्यानंतर शेवटी समाधानकारक परिणाम पाहायला मिळाले. त्यानंतर AWS तांत्रिकदृष्ट्या आणखी विकसित करण्यात आलं आणि पुण्यात डेटा रिसिव्हींग सेंटर तयार करण्यात आलं.
 
2006 ते 2007 मध्ये संपूर्ण भारतात 125 स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्यात आले. पुढे 2008-12 मध्ये 550 तयार झाले. सध्या 795 AWS केंद्र आहेत.
 
AWS मध्ये निरीक्षणं नोंदवताना कोणती आव्हानं असतात?
स्वयंचलित हवामान केंद्र एका इलेक्ट्रॉनिक सेन्सरच्या सहाय्यानं काम करतो. त्यामुळे उष्णतेची लाट असेल त्यावेळी या सेन्सरमध्ये बिघाड होण्याची शक्यता असते.
 
तापमान अधिक असेल आणि एखाद्या AWS केंद्राचं निरीक्षण इतर AWS पेक्षा आणि हवामान विभागाच्या निरीक्षणापेक्षा वेगळं असेल तर तो डेटा चुकीचा असतो असं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलं.
 
दुसरं म्हणजे ज्या ठिकाणी हे AWS बसवलं असेल त्या केंद्राचं नीट व्यवस्थापन केलेलं नसेल तरी डेटा चुकण्याची भीती असते. कम्युनिकेशनमधील बिघाड, उपकरणं चोरी होणं, वीजपुरवठा नसणं या गोष्टींमुळे सुद्धा AWS ला कधी कधी हवामानाची निरीक्षणं नोंदवणं कठीण होऊन बसतं.

Published By- Priya Dixit 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती